बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली आहे. शनिवार २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने केलेल्या छापेमारीदरम्यान एनसीबीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी आर्यनसह ७ जणांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. याप्रकरणी कोर्टात आर्यनची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी आर्यनला जामीन नाकारल्यानंतर शाहरुखने केस लढवण्यासाठी वकील बदलले आहेत. शाहरुखने वरिष्ठ वकील अमित देसाई यांची नियुक्ती आर्यनसाठी केली आहे. यामुळे अमित देसाई हे चांगलेच चर्चेत आले आहे. अमित देसाई यांनी ‘हिट अँड रन’ केसमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष सुटका करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती.
हिट अँड रन केस नेमकी काय?
२००२ मध्ये प्रचंड चर्चेत असलेल्या आणि गदारोळ माजवणाऱ्या हायप्रोफाईल ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा उल्लेख आजही केला जातो. याप्रकरणात अभिनेता सलमान खान अडचणीत सापडला होता. २००२ पासून सुरु असलेल्या या केसवर अनेकांची साक्ष घेण्यात आली होती. सर्व साक्षीदार आणि वकीलांच्या युक्तीवादानंतर २०१५ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.
आणखी वाचा : शाहरुखने घेतला सलमानचा सल्ला? आता मानेशिंदे नाही तर ‘हे’ वकील लढणार आर्यनची केस
मात्र त्यावेळी सलमानने कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले. मुंबई हायकोर्टात या केसची बाजू सांभाळण्यासाठी वरिष्ठ वकील अमित देसाई यांची नियुक्ती केली गेली. अमित देसाई यांनी सलमान खानच्या केसचा संपूर्ण अभ्यास केला. यानंतर त्यांनी हायकोर्टात जबरदस्त युक्तीवाद केला. त्या युक्तीवादानंतर सलमानला केवळ ३०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर काही वर्षांनी मुंबई हायकोर्टानं सबळ पुराव्यांअभावी सलमान खानची निर्दोष मुक्तता केली.
सलमानच्या सल्ल्यामुळे वकिल बदलला!
दरम्यान आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर सलमान खानने शाहरुखचा बंगला मन्नतवर धाव घेतली. यावेळी सलमान खाननेच शाहरुखला वकील बदलण्याचा सल्ला दिला असल्याचे बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आणखी वाचा : “आता देवच त्यांच्यावर बहिष्कार टाकतोय…”; शाहरुखवर संतापला एकेकाळचा सहकलाकार
पण या संपूर्ण प्रकरणानंतर वरिष्ठ वकील अमित देसाई हे आर्यन खानला जामीन मिळवून देण्यात यशस्वी ठरतात की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी कोर्टाने सलग पाच वेळा आर्यनला जामीन नाकारला आहे. त्यामुळे पुढील सुनावणीदरम्यान अमित देसाई कसा युक्तिवाद करतात? कोर्टात काय सांगतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.