पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत लवकरच नवं वळण येणार आहे. या मालिकेत सात वर्षांनी काळ पुढे गेल्याचं पाहायला मिळणार आहे. या लीपनंतर अहिल्याबाईंच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण अध्याय उलगडणार आहे. स्वतःचा मार्ग शोधताना सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि समाजातील अनिष्ट रूढींवर विजय मिळवत अहिल्याबाईंची पुढील वाटचाल या मालिकेतून दिसणार आहे.

लोकप्रिय अभिनेत्री एतशा संझगिरी तरुण अहिल्याबाई होळकरांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेसाठी निवड झाल्याचा आपला आनंद व्यक्त करताना एतशा संझगिरी म्हणाली, “भारतीय इतिहासातील एक अत्यंत महान महिला असलेल्या राणी अहिल्याबाई होळकर यांचा वारसा प्रेक्षकांपुढे उलगडून दाखवण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य मानते. मला आशा आहे की, या प्रेरणामूर्ती असलेल्या स्त्रीचे चरित्र पडद्यावर उलगडून दाखवण्यात मी यशस्वी होईन आणि प्रेक्षक माझ्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा असाच वर्षाव करत राहतील. ही नवीन वाटचाल सुरू करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. ” एतशा म्हणाली.

पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. या मालिकेतील दमदार कलाकरांच्या अभिनयाने मालिका अधिक जिवंत झाली आहे. मालिकेत लहानग्या अहिल्याला प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर आता मोठ्या झालेल्या अहिल्येला पाहणं उत्सुकचेचं असेल.