अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर अनेक देशवासियांचा देश सोडण्यासाठी संघर्ष सुरु केला आहे. तालिबान्यांनी देशावर ताबा मिळवताच देशवासियांचा आणि खास करून महिलांचा छळ करण्यास सुरुवात केलीय. अशात स्थिती महिलांसाठी अफगाणिस्तानमध्ये राहणं आता कठीण झालंय.
देश सोडण्यासाठी विमानतळांमवर लोकांची झुंबड उडत असल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. काबूलमध्ये तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर काही नशीबवान लोकांनाच काबूल सोडण्यात यश मिळालंय. यातच अफगाणिस्तानमधील सर्वात लोकप्रिय महिला पॉप स्टार आर्याना सईदचा समावेश आहे. आर्यानाने तिने काबूल सोडल्याची माहिती दिली आहे. अमेरिकन सैन्याच्या मदतीने आर्यानाने अफगाणिस्तान सोडलं असून आता ती अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी आर्याना अफगाणिस्तानमधील एका टेलिव्हजन शोमध्ये जजची भूमिका पार पाडत होती.
आर्यानाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून देखील देश सोडल्याची माहिती दिलीय. “मी सुखरूप आणि जिवंत आहे.दोन भयानक अविस्मरणीय रात्री नंतर, मी दोहा, कतारला पोहचले आहे आणि आता इस्तानबुलला जाणाऱ्या माझ्या विमानाची वाट पाहतेय.” असं आर्यानाने तिच्या पोस्टमधून सांगितलं. अरियानाने अमेरिकेच्या कार्गो विमानातून देश सोडला आहे.
View this post on Instagram
तालिबान्यांकडून अनेकदा आर्यानावर निशाणा साधण्यात आला आहे. २०१५ सालामध्ये आर्यानाने स्टेडियममध्ये परफॉर्मन्स सादर केल्याने तिच्यावर काही आरोप करण्यात आले होते. यात महिला असूनही स्टेडियममध्ये गाणं गायलाने तिचा निषेध करण्यात आला होता. तसचं हिजाब न घालणे, महिला असून स्टेडियममध्ये प्रवेश करणं या तालिबान्यांना मान्य नसणाऱ्या गोष्टी केल्याने तिचा निषेध करण्यात आला होता. यासाठीच आर्यानाने देश सोडला आहे. “घरी आल्यानंतर आणि या धक्क्यातून सावरल्यानंतर माझ्याकडे जगाला सांगण्यासाठी खूप काही आहे.” असं आर्याना तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाल्याचं वृत्त न्यूयॉर्क पोस्टने दिलंय.