ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना १४ दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. फुफ्फुसातील जंतुसंसर्गामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. ५ सप्टेंबर रोजी त्यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज देण्यात आला असला तरी ते पूर्णपणे बरे झालेले नाहीत. ‘डिएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार दिलीप कुमार यांना जेवण व औषधं ही नळीवाटे दिली जात आहेत.

दिलीप कुमार हे ९५ वर्षांचे आहेत. छातीत दुखू लागल्याने ५ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांना वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांना डिस्चार्ज दिलं असून दिलीप कुमार यांचे निकटवर्तीय फैसल फारूखी यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ‘तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि सदिच्छांबद्दल खूप खूप आभार. दिलीप कुमार यांची प्रकृती आता सुधारत असून ते घरी आहेत,’ असं फारूखी यांनी ट्विट केलं.