गेल्या वर्ष भरापासून करोनाचे काळे ढग आपल्या डोक्यावरून गेले नाहीत. राज्यात करोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मात्र, बॉलिवूडमधील रोज कोणी तरी एक व्यक्ती करोना पॉझिटीव असल्याचे समोर येत आहे. आता बॉलिवूड अभिनेता गोविंदाला करोना झाल्याचे समोर आले आहे. सध्या गोविंदा होम क्वारंटाइन आहे.

गोविंदाची पत्नी सुनीताने गोविंदाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, “आम्हाला आजच गोविंदाची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समजले. तो ठीक आहे, त्याला अत्यंत सौम्य लक्षणे आहेत, तो घरीच विलगीकरणात राहत आहे. आम्ही सतत डॉक्टरांनशी संपर्क साधतो, आणि त्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवून आहोत,” असे त्याची पत्नी सुनीता म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या,”गोविंदा करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही घरातील सगळ्यांची करोना चाचणी केली. तर, घरातील सगळ्यांची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे, सोबतच घरातील स्टाफची चाचणीही निगेटिव्ह आली आहे.”

दरम्यान, आज सकाळीच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. तर, काही दिवसांपूर्वी आलिया, रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख आणि गायक आदित्य नारायण आणि त्याच्या पत्नी या कलाकारांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Story img Loader