एके काळी स्वप्न म्हणून पाहिलेला चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ पडद्यावर आणण्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना यश मिळालेच. मात्र या त्यांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाने केवळ तिकीटबारीवर यश मिळवून दिले असे नाही तर सात राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले. भन्साळींना पहिल्यांदा या चित्रपटाने सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आहे. त्यामुळे सध्या आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे अशी अवस्था झालेल्या संजय लीला भन्साळींनी दोन नवीन चित्रपटांवर काम सुरू करत असल्याचे संकेत दिले आहेत.
गेली तीन वर्षे सातत्याने निर्माता आणि दिग्दर्शन या दोन्ही आघाडय़ांवर भन्साळी यशस्वी ठरले आहेत. व्यावसायिक निर्माता म्हणून त्यांनी प्रादेशिक चित्रपटांकडेही मोहरा वळवला आहे. या सगळ्या परिश्रमांचे चीज राष्ट्रीय पुरस्काराने झाले आहे असे म्हणावे. तर या यशाच्या निमित्ताने झालेल्या पार्टीत त्यांचा लाडका ‘देवदास’ अभिनेता शाहरुख खान याच्याबरोबर इतक्या वर्षांचा त्यांचा वादही संपुष्टात आला असल्याने त्यांच्या आनंदात भरच पडली असल्याचे भन्साळींनी सांगितले. या नव्या मैत्रीचा चांगला परिणाम लवकरच त्यांच्या या दोन नवीन चित्रपटांमधील एका चित्रपटावर नक्कीच होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शाहरुखच काय आपला कोणाबरोबरही कधीच वाद नव्हता, असे भन्साळी यांनी सांगितले. मात्र शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ आणि भन्साळींचा ‘सावरिया’ हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने त्या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. ‘शाहरुख खूप चांगला मित्र आहे. आणि आता आमचा कुठलाही चित्रपट एकाच तारखेला प्रदर्शित होत नसल्याने एकमेकांवर चिखलफेक करण्याचेही कारण उरलेले नाही’, असे सांगत भन्साळींनी या वादाला मूठमाती दिल्याचे स्पष्ट केले आहे. आता १३ वर्षांनी हे दोघे एकत्र काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘हम दिल दे चुके सनम’ नंतर आपल्याऐवजी शाहरुखबरोबर काम करण्यास पसंती देणाऱ्या भन्साळींशी सलमान खानचाही वाद झाला होता. ‘बाजीराव मस्तानी’ हा सलमान आणि करीना कपूर या जोडीला घेऊन त्यांना करायचा होता. पण ते त्यांना शक्य झाले नाही. मात्र तरीही नव्या जोडीला घेऊन का होईना हा चित्रपट पूर्ण झाल्याचा त्यांना जास्त आनंद वाटतो. सलमानशीही त्यांची नव्याने मैत्री झालेली असली तरी त्यांच्या नव्या चित्रपटात शाहरुखचीच वर्णी लागणार असल्याचे बोलले जाते. पुरस्काराचा आनंद साजरा करून झाला आहे. आता सध्या दोन पटकथांवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी एका चित्रपटासाठी पुन्हा एकदा रणवीर सिंगचे नाव निश्चित झाले आहे. मात्र सध्या रणवीर झोया अख्तरबरोबरच्या चित्रपटाला सुरुवात करणार असल्याने त्यानंतर भन्साळींच्या चित्रपटाची तयारी सुरू होईल. दुसऱ्या पटकथेसाठी शाहरुखबरोबर बोलणी होण्याची शक्यता जास्त आहे. याबद्दल भन्साळी फार काही सांगण्यास तयार नसले तरी त्या पटकथेवर काम सुरू झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा