‘ला कासा दे पपेल’ (La Casa De Papel) या स्पॅनिश वेब सीरिजची इंग्रजी आवृत्ती ‘मनी हाईस्ट’ (Money Heist) चांगलीच चर्चेत आहे. जगभरात लोकप्रिय झालेल्या या वेब सीरिजचा चौथा सिझन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या सीरिजमधल्या कलाकारांविषयी आणि विशेषत: प्रोफेसरविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. प्रोफेसरची भूमिका साकारणारा अल्वारो मोर्त (Álvaro Morte) हा अभिनेता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मात्र या सीरिजच्या पुढील भागामध्ये म्हणजेच पाचव्या सीझनमध्ये प्रोफेसरचा मृत्यू होणार असल्याचे संकेत अल्वारोने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दिल्याचे वृत्त एक्सप्रेस युकेने दिलं आहे. प्रोफेसर हा या मालिकेतील कथेचा मुख्य सुत्रधार आहे.

‘मनी हाईस्ट’चा पाचवा आणि सहावा सीझन येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असली तरी नेटफ्लिक्सने या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. असं असलं तरी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अल्वारोने आपल्या भूमिकेसंदर्भात काही स्पष्ट संकेत दिले आहेत. कार्यक्रमामधील बर्लिन, मॉस्को, ओस्लो आणि नैरोबी या भूमिकांचा शेवट करण्यात आल्यानंतर आता प्रोफेसरही मारला जाणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे.

“मला याची जाणीव आहे की माझ्या या वक्तव्यानंतर माझी लोकप्रियता कमी होऊ शकते. पण प्रोफेसर हे पात्र खूप विचित्र, अतिशय एकटेपणाने जगणाऱ्या माणसाचे आहे. या ग्रुपबरोबर जे काही घडतं आणि प्रोफेसर प्रेमात पडतो हे त्याच्या आयुष्यातील अनेक घटनांपैकी एक भाग आहे. एका ठराविक काळानंतर हे पात्र कथेचा भाग नसेल आणि त्याचा शेवट दाखवला जाईल. या पात्राचा शेवट कसा होणार यासंदर्भात बोलायचे झाल्यास मला असे वाटते की शेवटी त्याला पुन्हा एकटेपणाकडे जावेसे वाटेल. ज्या एकाकी आयुष्याची त्याला सवय झाली होती तिकडेच जाणे त्याला अधिक आवडेल. त्यात त्याला अधिक समाधान मिळेल,” असं मत अल्वारोने व्यक्त केलं आहे.

एकीकडे प्रोफेसरची भूमिका संपवली जाण्याची शक्यता असतानाच आर्तुरो रोमान हे सर्वाधिक द्वेष केले जाणारे पात्र पुढील भागामध्ये कथेच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.