आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्येच १०० कोटी रुपयांची कमाई केली. अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी देशभरात या चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. आता चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहता आलिया-रणबीर दिग्दर्शक अयान मुखर्जीसह सोमनाथ मंदिरामध्ये पोहोचले.
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट बॉयकॉट ट्रेंडमुळे सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. ‘बॉयकॉट ब्रम्हास्त्र’ हा ट्रेंड ट्विटरवर चर्चेत असताना चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का? हा मोठा प्रश्न होता. इतकंच नव्हे तर रणबीरचं गोमांस प्रकरणही खूप गाजलं. “मला गोमांस खायला आवडतं” हे त्याचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं. या त्याच्या वक्तव्यामुळे बराच वाद रंगला.
‘ब्रम्हास्त्र’ प्रदर्शित होण्यापूर्वीच आलिया-रणबीर उज्जैन येथील महाकाल मंदिरामध्ये पोहोचले. पण रणबीरच्या गोमांस प्रकरणामुळे तिथे या दोघांना प्रवेश नाकारण्यात आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेरच या दोघांचा रस्ता अडवल्याचंही पाहायला मिळालं. पण आता अयान मुखर्जीसह या दोघांनी सोमनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन अखेरीस महादेवाचं दर्शन घेतलं आहे.
आणखी वाचा – “मला गोमांस खायला आवडतं” ‘बॉयकॉट ब्रम्हास्त्र’ दरम्यान रणबीर कपूरचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत
अयान याने मंदिराबाहेरी फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. अयानसह फक्त रणबीरच या फोटोमध्ये दिसत आहे. आलियाचा या फोटोमध्ये सहभाग नाही. पण आज मुंबई विमानतळाबाहेरील आलिया-रणबीरचा एकत्रित व्हिडीओ व्हायरल झाला. सोमनाथाचं दर्शन घेण्यासाठी रणबीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि निळ्या रंगाचं मोदी जॅकेट परिधान केलं होतं. तसेच आलियाने देखीस पारंपरिक ड्रेस परिधान केला होता.