बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सगळ्या गोष्टी उघडपणे सांगते. साराने कधीच कोणती गोष्ट चाहत्यांपासून लपवलेली नाही. सारा लहान असताना आई-वडील सैफ अली खान आणि अमृता सिंग दोघे विभक्त झाले होते. त्यानंतर एकदा सारामुळे तिचे आई-वडील हे एकत्र आले होते. यावेळी तिला किती आनंद झाला याचा खुलासा साराने एका मुलाखतीत केला आहे.
‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सैफ आणि साराने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने या गोष्टीचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत साराने तिच्या आई-वडीलांच्या शेवटच्या भेटी बद्दल सांगितलं. “मी कॉलेजला जातं होते. आई आणि अब्बा मला सोडायला आले होते. त्याच दिवशी मी आणि अब्बा रात्री जेवायला बाहेर गेलो. तेव्हा आम्ही ठरवलं की आम्ही आईला सुद्धा बोलवूया. मी फोन केल्यानंतर ती तिथे आली आणि आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला. दोघांनी मला कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टी सेट करण्यासाठी मदत केली. एका ठिकाणी आई माझा बेड व्यवस्थित करत होती. तर, दुसरीकडे अब्बा लॅंप बल्ब लावत होते. आई आणि अब्बा दोघेही सोबत होते. तो दिवस मला नेहमी लक्षात असेल”, असे सारा म्हणाली.
अमृताने सारा आणि इब्राहिमला त्यांच्या वडीलांपासून कधीच लांब ठेवले नाही. सैफ अली खान आणि अमृता सिंगने कुटुंबाच्या विरोधात जाऊन १९९१ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या १३ वर्षांनंतर त्याचा घटस्फोट झाला.