”प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यासाठी २०२३ या वर्षाची सुरुवात अतिशय चांगली झाली आहे. नुकताच त्यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट ऑस्करच्या यादीत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर लगेचच आता याच चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘नाटू नाटू’चे म्युझिक कम्पोजर एम एम केरावनी यांनी पुरस्काराच्या घोषणेनंतर मंचावर जाऊन ट्रॉफी घेतली त्यानंतर त्यांनी पुरस्कारासह फोटोसाठी पोजही दिली. संपूर्ण भारतीयांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोकांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मनोरंजन विश्वातील बड्या लोकांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आणखी वाचा : अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल लवकरच येणार; निर्माते बोनी कपूर यांचं मोठं विधान
यानंतर राजामौली यांचं एक वक्तव्य मात्र चांगलंच चर्चेत आहे आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ‘रिपब्लिकवर्ल्ड. कॉम’शी संवाद साधताना राजामौली म्हणाले, “आरआरआर हा बॉलिवूड चित्रपट नाही, भारताच्या दक्षिण भागातील तो तेलुगू चित्रपट आहे जी आमची कर्मभूमी आहे. मी चित्रपटात गाण्यांचा वापर कथा पुढे घेऊन जाण्यासाठी करतो, चित्रपट मध्येच थांबवून गाणं आणि नाच याचा आस्वाद देणं मला पटत नाही. जर चित्रपट संपल्यावर जर लोकांना ३ तास कसे घालवले हे आठवत नसेल तरच तुम्ही स्वतःला एक यशस्वी फिल्ममेकर म्हणवून घेऊ शकता.”
राजामौली यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही लोक राजमौली यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आहेत. जागतिक पातळीवर या चित्रपटाने १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. याआधी न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल अवॉर्डमध्ये राजामौली यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. ऑस्करसाठीही शॉर्टलिस्ट झाल्यानंतर एखाद्या श्रेणीमध्ये ‘आरआरआर’ला नामांकन मिळावं अशी भारतीयांची अपेक्षा आहे.