गेल्या वर्षी हॉलीवूड स्टार जॉनी डेप आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अन् अभिनेत्री अँबर हर्ड यांचा न्यायालयीन खटला प्रचंड गाजला. हा असा एकमेव सेलेब्रिटी खटला होता, जो लाइव्हदेखील दाखवण्यात आला. जॉनीने हा मानहानीचा खटला पत्नीच्या विरोधात चालवला. सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने जॉनी डेपच्या बाजूने निकाल देत अँबर हर्डला १० मिलियन डॉलर म्हणजेच ७७ कोटी रुपये हे नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले होते. तर ५ मिलियन डॉलर म्हणजेच ३८ कोटी रुपये दंडात्मक नुकसान म्हणून भरण्याचे आदेशही कोर्टाने दिले.
या खटल्यादरम्यान बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. या दोघांनी एकमेकांवर अत्यंत खालच्या दर्जाचे आरोपही केले. उद्योगपती एलॉन मस्कचेही या प्रकरणात नाव घेण्यात आले होते. यानंतर अभिनेत्री अँबर हर्डच्या हातून ‘auqaman’ आणि असे बरेच मोठे प्रोजेक्ट निसटले. आता नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार अँबर हर्डने हॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा : ‘द केरला स्टोरी’ने ‘गार्डीयन्स ऑफ द गॅलक्सि ३’लाही टाकलं मागे; मार्वलच्या चित्रपटाने कमावले फक्त ‘इतके’ कोटी
अँबर हर्डचे जवळचे मित्र आणि नातेवाईक यांनीच या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अँबर हर्ड हॉलीवूड सोडून स्पेनमध्ये माद्रिद येथे जाणार आहे. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार अँबर हर्ड नुकतीच आपल्या मुलीसह स्पेनमध्ये स्थायिक झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. आपल्या मुलीला या सगळ्या वातावरणापासून दूर ठेवायचा अँबरचा विचार असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे.
अँबर हर्डच्या मित्रपरिवाराने या गोष्टीची पुष्टी केली आहे की सध्या तरी ॲम्बर हॉलीवूडमध्ये काम करण्यास अजिबात उत्सुक नाही. कदाचित ही तिच्यासाठी योग्य वेळ नाही पण ती नक्कीच पुन्हा कमबॅक करेल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली आहे. जॉनी डेपसह घटस्फोटानंतर अँबर हर्डने दावा केला होता की जॉनी दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. मात्र जॉनी डेपने हे आरोप फेटाळून लावले होते. २०१८ मध्ये अँबर हर्डने वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक ओपिनियन पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने स्वत:ला घरगुती हिंसाचारातून वाचले असल्याचे सांगितले.