करोना काळात पार्ट्या करणं बॉलिवूडकरांना चांगलंच भोवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकार करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा यांना करोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ निर्माता सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि अभिनेता संजय कपूर यांची पत्नी महिप कपूर यांनाही करोना झाला होता. यानंतर आता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर हिलाही करोनाची लागण झाली आहे. नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबतची माहिती दिली आहे.
शनायाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत करोना झाल्याची माहिती दिली आहे. शनाया म्हणाली, “मी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मला सौम्य लक्षणे असली तरी आता मला बरं वाटत आहे. मी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले आहे. चार दिवसांपूर्वी मी करोना चाचणी केली होती. त्यावेळी माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण सावधगिरी म्हणून मी पुन्हा करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.”
‘मी सध्या डॉक्टरांनी दिलेल्या प्रोटोकॉलचे पालन करत आहे. जर तुम्ही माझ्या संपर्कात आला असाल तर मी तुम्हाला विनंती करते की कृपया स्वतःची चाचणी करुन घ्या. सर्वजण सुरक्षित रहा!’ असेही शनाया म्हणाली.
तर दुसरीकडे करीना कपूर पाठोपाठ तिच्या घरी काम करणाऱ्या एका नोकरालाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तिलाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे.
आतापर्यंत कोणकोणत्या कलाकारांना करोनाची लागण?
- करीना कपूर
- करीना कपूरकडे घरकाम करणारी
- अमृता अरोरा
- महीप कपूर
- तनिषा मुखर्जी
- सीमा खान
- योहान खान
- शनाया मुखर्जी
हेही वाचा : बॉलिवूडकरांना पार्टी करणं पडलं महागात, सलमान खानच्या १० वर्षीय पुतण्याला करोनाची लागण
दरम्यान, करीना आणि अमृताच्या संपर्कात आलेल्या करिष्मा कपूर, मलायका अरोरा, अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया यांना घरीच आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. पहिली पार्टी रिया हिच्या घरी झाली होती. ही पार्टी ख्रिसमस पार्टी होती. त्यानंतर या दोघींनी अनेक खासगी पार्ट्यांना हजेरी लावली होती. त्यातच ग्रँड हयात हॉटेलमधील पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी गर्दी केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर आणि सारा तेंडुलकरनेही हजेरी लावली होती.