भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह ही सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चित्रपटांबाबत तसेच खाजगी आयुष्याबाबत व्यक्त होताना दिसते. इन्स्टाग्रामवर तर तिचे हजारो चाहते आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने ती अनेक ठिकाणी फिरत असते. मात्र एका कार्यक्रमात तिच्याबरोबर एक प्रसंग घडला ज्यामुळे तिने कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
अक्षरा सिंहने आपल्या गाण्यातून, अभिनयातून प्रेक्षकांचे कायमच मन जिंकले आहे. नुकतीच ती झारखंड येथे कार्यक्रम करण्यासाठी गेली होती. कार्यक्रमात ती परफॉर्मरन्स करताना एका व्यक्तीने तिच्यावर पैसे उडवले. त्या व्यक्तीच्या या कृत्याने अभिनेत्रीने चिडून स्टेजवरून तिने काढता पाय घेतला. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये अक्षरा आयोजकाकडे माईक सोपवत, कोणतेही स्पष्टीकरण न देता रागाने स्टेजवरून निघून गेल्याचे दिसले. अक्षराने मात्र घडलेल्या प्रकारावर कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. याआधीदेखील अशाच एक कार्यक्रमात तिच्याबरोबर विचित्र प्रकार घडला होता. जौनपूरमध्ये ती कार्यक्रम करत असताना तिच्यावर दगडफेक करण्यात आली होती.