या वर्षातला सर्वाधिक चर्चेचा ठरलेला दीप-वीरचा विवाहसोहळा अखेर संपन्न झाला आहे. मात्र तरीदेखील त्यांच्याविषयीची चर्चा काही केल्या कमी होत नाहीये. सध्या दीप-वीर रिसेप्शन पार्टी देण्यात व्यस्त असून या पार्टीनंतर दीप-वीरचा लगेचच आगामी चित्रपटांकडे वळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रणवीर त्याच्या ‘सिम्बा’च्या प्रमोशनकडे वळणार आहे. तर दीपिका आगामी चित्रपटाकडे वळणार आहे.

रोहित शेट्टीचा आगामी ‘सिम्बा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये रणवीर सिंग प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. मात्र प्रमोशन अद्यापही झालेलं नाही. त्यामुळे लग्नाचं रिसेप्शन पार पडल्यानंतर रणवीर प्रमोशनच्या कामाला लागणार असून दीपिकाही तिच्या आगामी चित्रपटाकडे वळणार आहेत.

अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या लक्ष्मी अग्रवाल या पीडित मुलीवर लवकरच चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असून दीपिका या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पुढील वर्षी मार्च महिन्यात सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलझार करणार आहेत.

सध्या दीपिका आणि रणवीर हे दोघेही मुंबईत असून ते २८ नोव्हेंबरला होणाऱ्या आपल्या रिसेप्शनची तयारी करत आहेत.दीपिका आणि रणवीरने मुंबईतील आपली रिसेप्शन पार्टी खास बॉलिवूड कलाकारांसाठी ठेवली आहे.