कलाविश्वातील सर्वाधिक मानाच्या मानल्या जाणाऱ्या ९५व्या अकादमी अवॉर्डची घोषणा १३ मार्च रोजी करण्यात आली. यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास ठरला. ‘द एलिफंट व्हिसपर्स’ या शॉर्ट फिल्मला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला. याबरोबरच बहुचर्चित एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यालाही ऑस्कर मिळाला.
नाटू नाटूला ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदाच भारताला एका गाण्याने ऑस्कर मिळवून दिला आहे. ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांपासून मोठमोठे सेलिब्रिटीजही याचं कौतुक करत आहेत.
आणखी वाचा : “ऑस्कर मिळाला पण…” ‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निर्मात्या गुनीत मोंगा यांनी व्यक्ती केली नाराजी
ऑस्कर मिळवून भारतात परतल्यावर नुकतीच दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि वडील चिरंजीवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट दिल्लीमध्येच झाली, या भेटीदरम्यानचे फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. राम चरण याने पुष्पगुच्छ आणि शाल देऊन अमित शहा यांचा सन्मान केला. यापाठोपाठ अमित शहा यांनीदेखील राम चरणचे अभिनंदन करत त्याचाही शाल देत सन्मान केला.
मीडिया रीपोर्टनुसार राम चरण लवकरच दिल्लीमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं म्हंटलं जात आहे. राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपट मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. देशाबरोबरच संपूर्ण जगात या चित्रपटाची क्रेझ होती. राम चरण व ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने कोटींची कमाई केली. आता ऑस्कर मिळाल्यामुळे याची सर्वत्र चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे.