सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची फारच आतुरतेने वाट पहात असतात. त्याच्या चित्रपटाची क्रेझ आपल्या भारतातही प्रचंड बघायला मिळते. याचा अंदाज त्याच्या नुकत्याच येऊ घातलेल्या ‘ओपनहायमर’ चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगवरून लावता येतो. मीडिया रीपोर्टच्या आकडेवारीनुसार, ‘ओपेनहायमर’ची आतापर्यंत संपूर्ण भारतात तीन लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.

विशेष म्हणजे काश्मीरमधील लोकही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘पठाण’नंतर काश्मीरमध्ये एवढी मोठी ओपनिंग मिळवणारा ‘ओपनहायमर’ हा दुसरा चित्रपट ठरणार आहे. काश्मीरमधील एकमेव INOX या चित्रपटगृहात ‘ओपनहायमर’ चे पहिल्या दिवसाचे सगळे शो हाऊसफुल्ल झाले आहेत. इतकेच नाही तर वीकेंडचीही ‘ओपनहायमर’ची बहुतांश तिकिटे विकली गेली आहेत. काश्मीरमधील लोकांची हॉलिवूड चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहून स्वत: थिएटर मालक विजय धर यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

आणखी वाचा : Oppenheimer Review : अणूबॉम्बच्या जनकाचा विचित्र पण तितकाच चित्तथरारक अन् खिळवून ठेवणारा प्रवास…

विजय इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना म्हणाले, “आम्ही जवळपास ३३ वर्षांनंतर हे चित्रपटगृह INOX च्या मदतीने पुन्हा सुरू केले आहे. तेव्हा इतक्या जोरदार प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. चित्रपटगृह उघडल्यानंतर पहिला चित्रपट होता ‘पठाण’. ज्याचे जवळपास सर्वच शो हाऊसफुल्ल होते. पण ‘पठाण’ नंतर ‘ओपनहायमर’ला मिळालेला लोकांचा प्रतिसाद आम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे. चांगल्या कलाकारांचे चित्रपट पाहण्यासाठी लोक आता चित्रपटगृहात येत आहेत हे बघून बरे वाटते.”

चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केली. त्याच्याबरोबरच रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नोलनच्या या चित्रपटाला भारतात पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

Story img Loader