समीर पाटील दिग्दर्शित, दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव या धमाल त्रिमूर्तीच्या ‘पोश्टर बॉईज’ने गेल्या वर्षी चांगलेच यश मिळवले होते. ग्रामीण भागात घडणाऱ्या या चित्रपटात नसबंदीवर केलेले हलकेफुलके भाष्य प्रेक्षकांच्याही पसंतीस पडले होते. या चित्रपटाच्या यशानंतर समीर पाटील यांनी ‘पोश्टर गर्ल’चा घाट घातला असून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
‘पोश्टर गर्ल’मध्ये दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा असाच एक वेगळा विषय घेऊन येणार आहेत, मात्र या वेळी त्यांच्या पोश्टरवर एक नवीन मुलगी असणार आहे. या चित्रपटाची कथा खरोखरच वेगळी आहे. मला जेव्हा पटकथा ऐकवण्यात आली तेव्हाच मी हा चित्रपटाच्या करारावर सही करून बाहेर पडले. ‘पोश्टर गर्ल’ हे चित्रपटाचे शीर्षक त्यानंतर ठेवण्यात आले, अशी माहिती सोनाली कुलकर्णीने ‘वृत्तांत’शी बोलताना दिली. वायकॉम १८ ने या चित्रपटाच्या निर्मितीचे शिवधनुष्य उचलले असून पटकथा स्वत: समीर पाटील आणि अभिनेता हेमंत ढोमे यांनी मिळून लिहिली आहे. चित्रपटातील संवादही हेमंतचेच असून एका साध्या पण हुशार-महत्त्वाकांक्षी अशा तरुणीची, तिच्याचमुळे घडलेल्या कथानकावर हा चित्रपट बेतला आहे. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटानंतर इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्याबद्दल सोनालीने आनंद व्यक्त केला.
‘पोश्टर बॉईज’ चित्रपटाचाही सिक्वल येऊ घातला आहे, मात्र या वेळी सिक्वलचे दिग्दर्शन श्रेयस तळपदेच करणार आहे. ‘पोश्टर गर्ल’ हा त्या अर्थाने ‘पोश्टर बॉईज’चा सिक्वलपट नाही, असे सोनालीने स्पष्ट केले. समीर पाटील यांचे पहिलेच दिग्दर्शन असलेल्या ‘पोश्टर बॉईज’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आता ‘पोश्टर गर्ल’मध्येही तितकीच उत्तम कथा दिग्दर्शक म्हणून समीर पाटील यांनी मांडण्याचा प्रयत्न केला असून अशा वेगळ्या कथानकावरचे चित्रपट करण्याची संधी फार कमी वेळा मिळते. ‘पोश्टर गर्ल’ हा अशा वेगळ्या चित्रपटांमधला एक असल्याचे तिने सांगितले. सध्या चित्रपटांच्या बाबतीत फारच निवडकपणा ठेवणाऱ्या सोनालीने विषय, दिग्दर्शकाची मांडणी आणि नवे काही तरी करण्याची संधी मिळाली तरच भूमिका करीत असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी ‘क्लासमेट’, ‘मितवा’ आणि ‘शटर’ अशा वेगवेगळे विषय, कलाकार असलेल्या चित्रपटांची हॅट्ट्रिक आपल्याला साधता आली. या वर्षांची सुरुवातच ‘पोश्टर गर्ल’सारख्या वेगळ्या चित्रपटाने होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतरच काही वेगळी भूमिका शोधण्याचा विचार असल्याचेही सोनालीने या वेळी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा