टीव्ही जगतातील सर्वांचा आवडता विनोदवीर आणि अभिनेता सुनील ग्रोवरवर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली. मुंबईच्या एशियन हार्ट इंस्टिट्यूटमध्ये त्याच्यावर ४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ३ फेब्रुवारीला त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. आता शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच सुनील ग्रोवरनं सोशल मीडियावर पोस्ट लिहून तब्येत कशी आहे याची माहिती दिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
हृदयावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर सुनील ग्रोवरनं ट्विटरवर पहिली पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या तब्येतीची माहिती देत चाहत्यांचे आभारही मानले आहेत. सुनील ग्रोवरनं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘माझी ट्रीटमेंट चांगली झाली आता मी यातून रिकव्हर होत आहे. सर्वांच्या प्रार्थनांसाठी मी आभारी आहे.’
दरम्यान डॉक्टरांनी ‘इ-टाइम्स’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार सुनील ग्रोवरला हृदय विकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर ४ बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जेव्हा त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं त्यावेळी त्याला करोनाहीची लागण झाली होती. मात्र आता सुनील ग्रोवरची तब्येत ठीक असून तो यातून लवकरच रिकव्हर होईल.