अयान मुखर्जी लिखित-दिग्दर्शिक ‘ब्रह्मास्त्र पार्ट १: शिवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या बिगबजेट चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसापासून या चित्रपटाची, त्यातील पात्राची सर्वत्र चर्चा होत आहे. ब्रह्मास्त्रमुळे बॉलिवूडविरोधात असलेले वातावरण बदलले असेही म्हटले जात आहे. बॉलिवूडमधील अनेक सिनेकलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक होत आहे. दरम्यान दिग्दर्शक महेश भट्ट यांनी या चित्रपटाबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे.
अनेक वर्षांपासून महेश भट्ट बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. त्यांनी या सिनेसृष्टीमध्ये दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथाकार म्हणून नाव कमावले आहे. ते त्यांच्या रोखठोक विधानांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेकदा अडचणीतही आले आहेत. त्यांनी नुकताच ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीचे तोंड भरुन कौतुक केले आहे. महेश भट्ट यांनी त्याला ‘भारताचा जेम्स कॅमेरॉन’ असे म्हटले आहे.
आणखी वाचा – बीफसंबंधी व्हिडीओवर विवेक अग्निहोत्रींचं स्पष्टीकरण, रणबीरची केली पाठराखण
पिंकव्हिला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “ब्रह्मास्त्र पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. जेव्हा मी चित्रपट पाहिला, तेव्हा मी भारतीय चित्रपटांमध्ये कधीही न पाहिलेल्या गोष्टी अनुभवल्या. अयान हा भारतीय चित्रपटसृष्टीचा जेम्स कॅमेरॉन आहे हे म्हणायला मला अजिबात संकोच वाटत नाही. असा भव्यदिव्य चित्रपट बनवण्यासाठी त्याला करन जोहर, डिज्नीचे उद्य शंकर, रणबीर, आलिया आणि संपूर्ण टीमचा पाठिंबा होता हेही विसरता येणार नाही. मला अयानच्या धाडसाचे फार अप्रूप वाटतं”
अयान मुखर्जीच्या अस्त्रवर्समधील दुसरा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र पार्ट २: देव’ २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यामध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटामध्ये ‘अमृता’ हे महत्त्वपूर्ण पात्र अभिनेत्री दीपिका पदुकोण साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय ‘देव’ हे पात्र कोण साकारणार आहे या प्रश्नावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.