‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर २ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकचं लग्न थाटामाटात पार पडलं. दोघांच्या लग्नाचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लग्नानंतर पहिल्यांदाच दोघांचा फोटो समोर आला आहे. अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने पोस्टमध्ये लिहले आहे राणा अंजलीला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळाले. आमच्यावर प्रेम केलेत, जे सकारात्मक वातावरण तयार निर्माण झाले याने आम्ही भारावून गेलो आहोत. आमचं नाव आयुष्य सुरु होत आहे आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तसेच आम्ही लवकरच लग्नाचे आणखीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करू, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“असाच एकमेकात जीव….” राणादा-पाठकबाईंना शुभेच्छा देणाऱ्या मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक व अक्षयाच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पुण्यामध्ये हार्दिक व अक्षयाचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला होता. दोघांनी घेतलेल्या उखाण्यांचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले आहेत. हार्दिक व अक्षयाने लग्नाच्या विधींसाठी खास लूक केला होता. दोघंही पारंपरिक लूकमध्ये फारच सुंदर दिसत होते. दोघांच्या रिसेप्शन सोहळ्याला अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. हार्दिक चक्क घोड्यावर बसून मंडपात आला होता.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. या मालिकेला प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत हार्दिक जोशीने राणादा ही भूमिका साकारली होती. तर अक्षया देवधर ही या मालिकेत पाठकबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली. आता चाहते पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत.