मूळ संकल्पना अतिशय चांगली आणि त्यावरचा चित्रपट गाजल्यानंतर हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपटांमध्येही सीक्वेल काढण्याची पद्धत सुरू झालीय. ‘अगं बाई अरेच्चा २’ हा या पद्धतीचा सीक्वेल असलेला दुसरा चित्रपट आहे. परंतु, हिंदीप्रमाणेच सीक्वेलपेक्षा मूळ चित्रपटच अधिक उत्तम आणि गमतीदार होता असे हा चित्रपट rv14पाहताना प्रेक्षकाला वाटते. याचे प्रमुख कारण म्हणजे मूळ चित्रपटातील गंमत, कलावंत, कथा-पटकथा सारेच बदलून केवळ शीर्षकामध्येच सीक्वेलचा आभास निर्माण केला गेला आहे. सीक्वेलमध्ये अपेक्षित असलेली मूळ चित्रपटाच्या कथानकाचे सूत्र ठेवून नवीन गोष्ट गुंफण्याचा प्रकार न करता संपूर्ण नवीनच फॅण्टसीवर बेतलेला हा चित्रपट आहे. मध्यांतरापर्यंत चित्रपटाच्या मध्यवर्ती संकल्पनेची गंमत टिकून राहते आणि प्रेक्षकाची करमणूकही हा चित्रपट करतो. परंतु, मध्यांतरानंतर मात्र योगायोगांचा गुंता अतिरंजित होत जातो आणि त्यामुळे प्रेक्षकाला कंटाळा येतो.
फॅण्टसी म्हटल्यावर अजबगजब संकल्पना चित्रपटातून मांडणे आणि बिनडोक करमणूक करणे हे गृहीत धरूनही प्रेक्षकांचे रंजन करता येते. परंतु, या चित्रपटांत योगायोगांचा भडिमार वाढत जातो आणि शेवटापर्यंत प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात चित्रपट माफक यशस्वी ठरतो. शुभांगी कुडाळकर ही चित्रपटाची नायिका आहे. लहानपणापासूनच तिला जो मुलगा आवडतो, त्याच्यावर तिचे प्रेम जडले आणि नंतर तिने त्याला स्पर्श केला तर त्या मुलाच्या आयुष्यात अघटित काहीतरी घडते असे. लहानपणापासून हा सिलसिला सुरू होतो.
तरुणपणीही शुभांगीच्या आयुष्यात येणाऱ्या तरुणांच्या बाबतीत शुभांगीने त्यांना स्पर्श केल्यानंतर चमत्कारिक गोष्टी
घडतात. म्हणून शुभांगीला सगळेजण अपशकुनी, अवलक्षणी वगैरे वगैरे संबोधने लावली जातात. म्हणून शुभांगी लग्न करण्याचा विचारच सोडून देते. परंतु, तिचा हा निश्चय टिकत नाही आणि पुन:पुन्हा शुभांगीच्या आयुष्यात तिच्यावर प्रेम करणारे आणि ज्यांच्यावर तिचेही प्रेम जडते असे तरुण भेटतात. निरनिराळ्या काळात निरनिराळ्या ठिकाणी भेटलेल्या या तरुणांना शुभांगीने स्पर्श केल्यानंतर घडणाऱ्या घटनांभोवती चित्रपटाची गोष्ट गुंफण्यात आली आहे.
ज्या गोष्टी घडणे शक्य नाही त्या सर्व कल्पनेत घडू शकतात आणि याच फॅण्टसीवर अनेक चांगले चित्रपट मराठी-हिंदी आणि जगभरात नेहमीच येत असतात. हा चित्रपट पाहताना सुरुवातीला स्पर्शाच्या चमत्काराची ही गोष्ट प्रेक्षकाची करमणूक करण्यात निश्चितच यशस्वी होते. मध्यांतरापर्यंत स्पर्श चमत्काराची संकल्पना समजून घेत त्यातून होणाऱ्या गमतीजमती पाहताना प्रेक्षक रंगून जातो हे खरे. परंतु, मध्यांतरानंतरच्या योगायोगांचा भडिमार आणि त्यातून होणारी फालतू विनोदनिर्मिती यामुळे स्टॅण्डअप कॉमेडीच्या स्कीटसारखे प्रेक्षकाला वाटते. त्यामुळे कंटाळा येतो.  स्पर्शाच्या चमत्काराची फॅण्टसीची गंमत थोडक्यात बरी वाटते; परंतु मध्यांतरानंतरच्या अति रंजितपणामुळे चित्रपट मर्यादित यशस्वी ठरतो.
सततच्या योगायोगांच्या भडिमारामध्ये या चित्रपटाचे संगीत आणि गाणी यामुळे प्रेक्षक रमतो. सोनाली कुलकर्णीने शुभांगी कुडाळकर ही दिग्दर्शकाबरहुकूम साकारली आहे. परंतु, ही व्यक्तिरेखा आक्रस्ताळी पद्धतीने  पडद्यावर वावरते. मात्र हा सीक्वेल  पाहताना मूळ चित्रपटातली गंमत पुन:पुन्हा आठवत राहते हेही खरे. उत्तम छायालेखन, उत्तम संगीत, उत्तम चित्रीकरण स्थळे या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.
मध्यांतरापर्यंत धमाल विनोदी चित्रपट मध्यांतरानंतर अतिरंजितपणाकडे झुकल्याने गंमत हरवून बसतो. त्यामुळे माफक यशस्वी ठरला आहे.
अगं बाई अरेच्चा २
निर्माता – नरेंद्र फिरोदिया आणि सुनील लुल्ला
दिग्दर्शक – केदार शिंदे
कथा – दिलीप प्रभावळकर, केदार शिंदे
पटकथा – ओंकार मंगेश दत्त
संवाद – दिलीप प्रभावळकर, केदार शिंदे, ओंकार मंगेश दत्त
छायालेखन – सुरेश देशमाने
संकलन – मनीष मेस्त्री
संगीत – निशाद
कलावंत – सोनाली कुलकर्णी, धर्मेद्र गोहिल, गौरवी, शिवराज वायचळ, सुरभी हांडे, माधव देवचाके, भरत जाधव, वरूण, प्रसाद ओक, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, विद्या पटवर्धन, वरुण, स्वप्नील मुनोत, सिद्धार्थ जाधव व अन्य.

 

Story img Loader