चॉकलेट हिरो म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या ऋषी कपूरला आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र उत्कृष्ट ‘खलनायक’ अशी ओळख मिळाली आहे. ‘अग्निपथ’साठी दिग्दर्शक करण मल्होत्राने खलनायक साकारण्यासाठी ऋषी कपूरचा पिच्छा पुरवला होता. ‘मी आणि खलनायक?..शक्यच नाही’ म्हणून त्याला वेडय़ात काढणारा ऋषी अखेर निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही करणच्या आग्रहाला बळी पडला. आणि ‘अग्निपथ’मध्ये रौफ लालाच्या भूमिकेतील ऋ षी कपूरला प्रेक्षकांची वाहवा मिळाली.
तो उत्कृष्ट खलनायक साकारू शकतो, हे सिद्ध झाल्यामुळे आणखी काही खलनायकी भूमिकांसाठी त्याला विचारणा होऊ लागली आहे. आता निखिल अडवाणीच्या ‘डी डे’ या चित्रपटात ऋषी पुन्हा एकदा प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘डी डे’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी बोलताना ‘अग्निपथ’ मधल्या रौफ लालाच्या भूमिकेसाठी ऋषी कपूरला जी लोकांची दाद मिळाली त्यामुळेच ‘डी डे’ मधल्या मुख्य खलनायकी भूमिकेसाठी त्यांना पटवणे आपल्याला सोपे गेल्याचे निखिलने सांगितले. ‘मी त्यांना भेटलो, पटकथा ऐकवली, त्यांची व्यक्तिरेखा सविस्तर समजावून सांगितली, तेव्हा त्यांनी मला करणसारखेच वेडय़ात काढले. मी अशी कुठलीही भूमिका करणार नाही, असे सांगून टाकले. तेव्हा मग मी त्यांच्या समाधानासाठी म्हणून लूक टेस्ट घेतली. या भूमिकेसाठी ते किती चपखल दिसत आहेत ते समजावून सांगितले. तेव्हा कुठे मला हिरवा कंदिल मिळाला’, अशी आठवण निखिलने सांगितली. ऋषी कपूर यांनी निखिल अडवाणीबरोबर ‘पतियाळा हाऊस’ या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती.
सत्तरच्या दशकात नायक म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या ऋषी कपूरने अगदी नव्वदच्या दशकापर्यंत केलेल्या ‘दामिनी’, ‘दिवाना’ सारख्या चित्रपटापर्यंत चॉकेलट हिरोचीच भूमिका साकारली. त्याने कधीही नकारी व्यक्तिरेखा साकारली नाही. आता साठीत असलेल्या ऋषी कपूरसाठी फार तर चरित्र अभिनेत्याच्या भूमिका असतील, अशी स्वत: त्याचीही कल्पना होती. पण, अग्निपथमधील भूमिकेमुळे त्याच्यासाठी अभिनयाचे एक नवे दालन खुले झाले आहे. ‘औरंगजेब’ या चित्रपटात ऋषी कपूर इन्स्पेक्टरच्या भूमिकेत होता. पण तरीही त्याच्या व्यक्तिरेखेला नकारी छटा होती. आता ‘डी डे’ मध्ये ऋषी कपूर एका अंडरवर्ल्ड डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘डी डे’च्या ट्रेलरमध्ये ऋषी कपूरला लोकांची आत्तापासूनच दाद मिळते आहे.
दाऊद नव्हे!
डॉन म्हणजे दाऊद असे समीकरण असले तरी या चित्रपटातील डॉनचा दाऊदशी संबंध नाही पण, १९९२-९३ च्या मुंबई दंगलीदरम्यान ज्या घटना घडल्या त्यावरून प्रभावित झालेली अशी ‘डी डे’ची कथा असल्याचे निखिल अडवाणीने स्पष्ट केले आहे.
ऋषी पुन्हा खलनायक!
चॉकलेट हिरो म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या ऋषी कपूरला आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र उत्कृष्ट ‘खलनायक’ अशी ओळख मिळाली आहे. ‘अग्निपथ’साठी दिग्दर्शक करण मल्होत्राने खलनायक साकारण्यासाठी ऋषी कपूरचा पिच्छा पुरवला होता. ‘मी आणि खलनायक?..शक्यच नाही’ म्हणून त्याला वेडय़ात काढणारा ऋषी अखेर निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही करणच्या आग्रहाला बळी पडला.
आणखी वाचा
First published on: 25-05-2013 at 02:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agneepath helped me convince rishi kapoor for d day role nikhil advani