छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अग्निहोत्र आणि स्वप्नांच्या पलिकडले या मालिकांचे पुनःप्रसारण करण्यात येणार आहे. घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिका प्रेक्षकांच्या आग्रहाखातर येत्या काही दिवसांत हा खजिना घेऊन पुन्हा येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टार प्रवाह वाहिनीवरुन प्रसारीत होणाऱ्या या दोन मालिकांना छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. विशेष म्हणजे या मालिका दुपारच्या वेळात दाखविल्या जाणार असल्याने गृहीणी आणि ज्येष्ठ नागरीकांना मालिका पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. १५ मे पासून सोमवार ते शनिवार  या मालिकांचं पुनःप्रसारण स्टार प्रवाह वाहीनीवर होणार असल्याचे वाहीनीच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. अग्निहोत्र ही मालिका दुपारी १२ वाजता आणि स्वप्नांच्या पलिकडले ही मालिका दुपारी १२.३० वाजता दाखवली जाणार आहे.
‘अनमोल ठेवा’ या संकल्पनेअंतर्गत स्टार प्रवाहनं अलिकडेच राजा शिवछत्रपती या गाजलेलं मालिकेचं पुनःप्रसारण सुरू केलं. आठ वर्षांनंतरही या मालिकेला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच आता अग्निहोत्र आणि स्वप्नांच्या पलिकडले या दोन मालिकाही पुनःप्रसारीत कऱण्यात येत आहेत. या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. राजा शिवछत्रपती या मालिकेमुळे या दोन मालिका पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती.  या मागणीचा योग्य तो विचार करुन मालिकांचं पुनःप्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘अग्निहोत्र’ या मालिकेचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचं आहे. सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, स्पृहा जोशी, लीना भागवत, विभावरी देशपांडे, मुक्ता बर्वे, विक्रम गोखले, विनय आपटे, मोहन जोशी, शरद पोंक्षे असे दिग्गज कलाकार या मालिकेत आहेत. तर ‘स्वप्नांच्या पलिकडले’ या मालिकेत गौरी नलावडे, चिन्मय उदगीरकर, माधवी निमकर, भारती पाटील, चैत्राली गुप्ते, विक्रम गायकवाड, शेखर नवरे अश्या नामवंत कलाकारांचा समावेश आहे. केदार वैद्य यांनी मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agnihotra and swapnanchya palikadle serials of star pravah will retelecast soon