१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलावर झालेल्या भ्याड हल्लात ४१ जवान शहीद झाले. या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघनेच्या तळावर हल्ला करत ते उद्धवस्त केले. पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या १२ दिवसामध्ये भारतीय वायू दलाने ही कारवाई केली. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरामध्ये संतापाचं वातावरण पसरलं होतं. यामध्ये ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने’(AICWA) देखील पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर AICWA ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीत पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारण्यात यावा अशी मागणी केली आहे.
“आमच्यासाठी देश पहिला आहे आणि आम्ही देशासाठी नेहमीच उभं राहू”, असं AICWA ने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यासोबतच आपण अधिकृतरित्या पाकिस्तानी कलाकारांवर बॉलिवूडमध्ये काम करण्यावर बंदी घालत असल्याचं AICWA परिपत्रकाद्वारे जाहीर केलं होतं. त्यानंतर AICWA पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहीलं आहे. या पत्रानुसार, ‘पाकिस्तानी कलाकार, फिल्म एसोसिएशन आणि माध्यम प्रतिनिधी यापैकी कोणालाही व्हिसा मिळू नये’, यासाठी विनंती केली आहे.
“पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एकदा तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. यापूर्वी आम्ही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली होती. मात्र आता आम्हाला पाकिस्तानी कलाकार किंवा कलाविश्वाशी जोडलेला कोणताच पाकिस्तानी व्यक्ती नकोय. आम्हाला असं वाटतंय की पाकिस्तानी कलाकार किंवा या क्षेत्राशीसंबंधित कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीचा आमच्या क्षेत्राशी संबंध नसावा. त्यामुळेच या व्यक्तींना व्हिसा मिळू नये”, असं AICWA ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
All India Cine Workers Assn in a letter to PM Modi in regards with Pakistan’s ban on release of Indian Movie or content in Pak:AICWA on behalf of entire film&media fraternity would demand complete shut down on issuing any Visa to Pakistani actors,Film Association&Media Fraternity pic.twitter.com/Yo5BJ07w5q
— ANI (@ANI) February 26, 2019
या पत्रात पुढे असंही नमूद करण्यात आलं आहे, “मंगळवारी भारतीय वायू सेनेने केलेली कारवाई खरंच कौतुकास्पद आहे. आम्हाला आपल्या लष्कराचा कायमच विश्वास आणि अभिमान होता. मात्र वायूसेनेने बालाकोट येथे केलेल्या सर्जिकल स्टाईकनंतर आमच्या मनातील सेनेविषयीचा अभिमान द्विगुणित झाला आहे”.
दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात केलेली ही मोठी कारवाई आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोचे बॉम्ब फेकले. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.