प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील आरोपीने चौकशीदरम्यान दिली आहे. मुसेवाला हत्या प्रकरणामध्ये नेपाळ पोलिसांनी तिघांना अटक केली. यामध्ये दीपक मुंडीसहीत कपिल पंडित आणि राजिंदर दोन शार्प शूटर्सलाही पोलिसांनी पश्चिम बंगाल-नेपाळ सीमेवरून अटक केली. यापैकीच कपिल पंडित याने सलमानच्या हत्येच्या कटाची माहिती पोलिसांना दिली असून सलमानच्या घराची रेकीही करण्यात आल्याचा खुलासा त्याने केला आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण: काळवीट शिकारीवरुन बिष्णोई गँगच्या टार्गेटवर सलमानला खान; पण बिष्णोई समाजासाठी काळवीट एवढं महत्वाचं का?
सिद्धू मुसेवाला प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण २३ जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणातील दोन जणांना पंजाब पोलिसांसोबत काही आठवड्यापूर्वी झालेल्या चकमकीमध्ये कंठस्थान घालण्यात आलं. त्यानंतरही या प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरु असून या हत्येचा कट रचण्यामध्ये एकूण ३५ जणांचा सहभाग असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. अटक झालेले आणि गोळीबारामध्ये मरण पावलेल्या आरोपींव्यतिरिक्त एकूण १२ आरोपी अद्यापही फरार असल्याचं सांगितलं जात आहे. नुकतेच या प्रकरणात अटक केलेल्या कपिल पंडितने सलमानच्या घराची रेकी केल्याचा दावा केला आहे.
सलमानच्या घराची रेकी करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील काही जण दोन ते तीन वेळा मुंबईत आल्याची माहिती कपिल पंडितने पोलीस चौकशीदरम्यान दिल्याची माहिती पंजाब पोलीस खात्याचे डीजीपी गौरव यादव यांनी दिली आहे. कपिल पंडितने संतोष यादव आणि इतर काही सहकाऱ्यांसोबत आपण स्वत: सलमानच्या वांद्रा येथील घराची रेकी केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. सलमान घरातून कधी निघतो, त्याचे वडील आणि गीतकार सलीम खान हे कधी आणि कुठे मॉर्निंग वॉकला जातात यावर आपण पाळत ठेऊन होतो असंही पंडितने सांगितलं आहे. सलामनच्या दैनंदिन वेळापत्रकासोबतच तो शहरामध्ये कुठे कुठे शुटींगसाठी जातो, त्याचा घरातून निघण्याचा आणि घरी येण्याचा वेळ काय आहे यासंदर्भातील माहिती गोळा केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. संपत नेहरा आणि गोल्डी बरार यांच्या माध्यमातून लॉरेन्स-बिश्नोई टोळीने आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती कपिल पंडितने दिली आहे.
सिद्धु ममुसेवाला आणि सलमान खान हे दोघेही लॉरेन्स-बिश्नोई टोळीच्या रडावर होते. मात्र मुसेवाला यांच्या हत्येनंतर या टोळीतील अनेक शार्प शूटर्सला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणामध्ये नवे खुलासे होत असून त्यानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या माध्यमातूनही छापेमारी सुरु आहे. देशातील वेगवेगळ्या ६० ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणात अन्य ठिकाणांवरही छापेमारी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जूनमध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. “तुझाही सिद्धू मूसेवाला करून टाकू” अशा आशयाचं निनावी पत्र सलमान खानच्या घराजवळ सापडलं होतं. या प्रकारानंतर पोलिसांनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली. १९९८ साली काळवीट शिकार केल्याप्रकरणी धडा शिकवण्यावासाठी २०१८ मध्ये सलमान खानला मारण्याची योजना आखली होती. त्यासाठी काही साथीदारांना सलमान खानच्या घराची रेकी करण्यासाठी आणि त्याची हत्या करण्यासाठी मुंबईला पाठवलं होतं, असा खुलासा लॉरेन्स बिश्नोईने केला होता.