बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.

सुशांत सिंहचा १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं असलं तरी ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय याप्रकरणी तपास करत असून आपण सर्व बाजूंची पडताळणी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aiims dr sudhir gupta ruled out murder angle in sushant singh rajput death case sgy