हवाई क्षेत्रातील मुलींचे स्थान असा विषय निघाल्यास पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतात त्या ‘हवाई सुंदरी.’ मात्र त्यापुढे जाऊन एक महिला ‘वैमानिक’सुद्धा असू शकते हे वास्तव स्वीकारायला आपल्याला बराच काळ जावा लागला. आज परदेशातच नाही तर भारतातही कित्येक तरुणी पुरुषांचे क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हवाई क्षेत्रात आपले पाय भक्कमपणे रोवून उभ्या आहेत. टय़ुलिप जोशीची मुख्य भूमिका असलेली एका महिला ‘वैमानिके’ची कहाणी सांगणारी ‘एअरलाइन्स’ ही नवी मालिका ‘स्टार प्लस’वर येत आहे.
 लहानपणापासून वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनन्या रावतला हा प्रवास सोप्पा नसेल याची खात्री असतेच, त्यामुळे प्रत्येक आव्हानाला धर्याने सामोरे जात ती आपले स्वप्न कसे पूर्ण करते यावर ही मालिका आधारित असल्याचे, मालिकेच्या लेखिका अद्विका काला यांनी सांगितले. आजही हवाई क्षेत्रामध्ये काम करणारी तरुणी म्हणजे ‘हवाई सुंदरी’ हेच समीकरण आपल्या डोक्यात घट्ट बसलेले आहे. पण ती वैमानिकसुद्धा असू शकते हे पचनी पडणे थोडे कठीण जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर २०१३ पासून ‘स्टार प्लस’च्या टीमसोबत मी या मालिकेवर काम करण्यास सुरवात केली. तेव्हा फक्त उत्सुकता वाढवण्यासाठी मी या मालिकेचे पहिले पोस्टर फेसबुकवर टाकले आणि तेव्हाही लोकांनी ही हवाईसुंदरींवर आधारित मालिका आहे असाच समज करून घेतल्याचे त्या पुढे म्हणाल्या.
अर्थात, क्षेत्र कुठलेही असो त्यात स्पर्धा-आव्हाने ही असणारच. अनन्याने आपले वैमानिक बनण्याचे स्वप्न जरी पूर्ण केले असले तरी स्पर्धेतून तिची सुटका नाही. एक महिला वैमानिक म्हटलं की तिला सर्वात पहिल्यांदा सामना करावा लागतो तो मत्सराचा. हे पूर्णपणे पुरुषांचं क्षेत्र मानलं जातं. मालिकेच्या निमित्ताने आम्ही जे संशोधन केलं त्यात पुरुषांच्या तुलनेत भारतातील महिला वैमानिकांचे प्रमाण केवळ १० टक्केच असल्याची बाब समोर आली. त्यातही त्यांना दुय्यम समजलं जातं.
वैमानिकांच्या दर सहा महिन्यांनी होणाऱ्या क्षमता चाचणीदरम्यान मी काही पुरुष वैमानिकांना त्यांच्यातील आणि स्त्री वैमानिकांमधील फरक विचारला असता, त्यांनी सांगितलं की, संकटाच्या वेळी स्त्री वैमानिक तत्परतेने निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्याक डून आलेली ही उत्तरं मला खटकली. एखादी महिला वैमानिक अशी असू शकते, पण म्हणून सर्वच महिला वैमानिकांना त्या पारडय़ात तोलणे चुकीचे आहे. अशा बारीकसारीक गोष्टींचे भान मी मालिकेचे लेखन करताना ठेवल्याचेही त्या सांगतात. ‘केवळ पुरुष नाही तर या स्त्रियांमध्येसुद्धा आपापसात व्यावसायिक हेवेदावे असतात. एक वैमानिक आणि हवाईसुंदरी यांना मिळणारा पगार, सुखसोयी, मान यात फरक असतो. आणि हेच या भांडणांमागचे मुख्य कारण असल्याचे त्या सांगतात.
या मालिकेची नायिका अनन्या एक वैमानिक म्हणून अगदी खराब हवामानामुळे विमान चालवताना होणारा त्रास ते विमानाच्या अपहरणापर्यंत आलेल्या संकटांना कशी सामोरी जाते, हे प्रेक्षकांना या मालिकेतून पाहायला मिळेल. हे सर्व करताना ही मालिका कुठेल्याही पद्धतीने घरगुती कलहांमध्ये गुरफटून राहणार नाही याची दक्षताही घेतल्याचे अद्विका आवर्जून सांगतात.
‘अनन्या एक महत्त्वाकांक्षी तरुणी आहे. त्यामुळे घर, संसार, लग्न याला आराम देऊन तिने केवळ आपली वैमानिक म्हणून कारकीर्द मोठी करण्याचं स्वप्नं पूर्ण व्हावं यावर भर दिला आहे. ही मालिका २६ भागांपुरती मर्यादित स्वरूपाची केली आहे त्यामुळे त्याची मांडणीही सुलभ झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
‘सेट’ विमानाचा
वैमानिकाच्या आयुष्यावर आधारित मालिका असल्याने विमान असणे आवश्यक होते. त्यासाठी दिल्लीमध्ये नॉएडाच्या फिल्मसिटीमध्ये खास या मालिकेसाठी एक विमान बनवण्यात आले आहे. मालिकेसाठी विमान बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ‘बोईंग ३७०’ या प्रवासी विमानाची प्रतिकृती इथे बनवण्यात आली असून, त्याची लांबी, रुंदी, इतकेच नाही तर विमानाच्या आतील खुच्र्याची संख्या, त्यांमधील अंतर, विमानातील बटन्स, वैमानिकाचा कक्ष अगदी हुबेहूब बनवण्यात आल्याचे निर्माता निखिल अल्वा यांनी सांगितले. विमानाबाहेरील चित्रण ‘व्हीएफ एक्स’च्या मदतीने केले असले तरी विमानाच्या आत घडणाऱ्या कथानकाचा खरेपणा टिकवून ठेवण्यासाठी या विमानाची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader