सध्या मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. टेलिव्हिजनवरील अनेक कलाकारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये लग्न केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता एक बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार असल्याचे विशेष वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ वेबसाइटने दिले आहे. ‘आयशा’ चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अमृता पुरी आज तिच्या प्रियकराशी बँकॉकमध्ये लग्न करणार असल्याचे कळते. ‘पी.ओ.डब्ल्यू – बंदी युद्ध के’ मालिकेत शेवटची झळकलेली ही अभिनेत्री तिच्या ‘फेरी टेल वेडिंग’साठी परिवार आणि मित्रमंडळींसह काही दिवसांपूर्वीच बँकॉकला पोहोचली. गेल्या अनेक वर्षांपासून अमृता हॉटेलियर इमरून सेठीला डेट करत होती.
वाचा : या तमिळ अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी आहेत तब्बल २०० सुरक्षारक्षक
सोनम कपूरच्या चित्रपटातून अमृताने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर हळूहळू आपला जम बसवण्यास सुरुवात केली. सुशांत सिंह राजपूतच्या ‘काय पो छे’मध्ये तिने त्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘पी.ओ.डब्ल्यू – बंदी युद्ध के’ मालिकेतून टेलिव्हिजन जगतात पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीच्या कामाचे बरेच कौतुक झाले.
अमृताचे जवळचे मित्रमैत्रिणी आणि पी.ओ.डब्ल्यूतील सहकलाकार संध्या मृदुल, सत्यदीप शर्मा, आयशा चोप्रा आणि इतरही काही कलाकारांनी तिच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण, मालिकेत अमृताच्या पतीची भूमिका साकारणारा अभिनेता पूरब कोहली काही कारणास्तव तिच्या लग्नाला जाऊ शकला नाही. मात्र, तो तिच्या प्रत्येक फोटोवर आवर्जून कमेंट करत आहे.
वाचा : मुंबईच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरत होती हॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री
स्वतः अमृताही तिच्या आयुष्यातील या अविस्मरणीय क्षणांचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. एका फोटोत तिच्या हातावर मेहंदी काढण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचे दिसते. तर संगीत सोहळ्यातील फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातल्याचे दिसते.
https://www.instagram.com/p/Ba5zeZyFoZm/