अभिषेक- ऐश्वर्या या जोडीनं ‘कुछ ना कहो’, ‘धुम २’, ‘रावण’, ‘सरकार राज’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केलं. मात्र गेल्या कित्येक वर्षांत जाहिराती सोडल्या तरी ही जोडी एकत्र दिसलीच नाही. ‘गुलाबजाम’ या चित्रपटात अभिषेक-ऐश्वर्या बच्चन एकत्र दिसणार होते. मात्र काही कारणानं या चित्रपटातून दोघांनी माघार घेतली. आता ही जोडी संजय लिला भन्साळींच्या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या अमर प्रेमकथेवर आधारित चित्रपट घेऊन संजय लिला भन्साळीं येत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन साहिर लुधियानवी तर ऐश्वर्या राय बच्चन ही अमृता प्रीतम यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. अद्यापही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र ऐश्वर्या आणि अभिषेकच या चित्रपटात दिसतील असं म्हटलं जात आहे.
या आधी दीपिका पादुकोन हिचं नाव अमृता प्रीतम यांच्या भूमिकेसाठी सुचवलं गेलं होतं. ‘राम लीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या चित्रपटात भन्साळींसोबत दीपिकानं काम केलं होतं त्यामुळे अमृता यांच्या भूमिकेसाठी पहिल्यापासून दीपिकाला पसंती असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता भन्साळींनी ऐश्वर्याची निवड केली असल्याच्या चर्चा आहे. जर ऐश्वर्या- अभिषेकनं होकार दिला तर बऱ्याच वर्षांनी ही जोडी छोट्या पडद्यावर एकत्र दिसेल.