ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन अनुराग कश्यपच्या ‘गुलाब जामुन’ या चित्रपटातून बऱ्याच वर्षांनंतर एकत्र काम करणार होते. मात्र या दोघांनाही एकत्र पाहण्याचं चाहत्यांचं स्वप्न जवळजवळ भंगणार आहे कारण, या दोघांनीही ‘गुलाब जामुन’ चित्रपटाला नकार दिला असल्याचं समजत आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेकला साधरण दीड एक वर्षांपूर्वी या चित्रपटाची ऑफर आली होती. चित्रपटाची कथा ऐश्वर्याला खूपच आवडली. या जोडप्यानं कथेत काही छोटेसे बदलही सुचवले होते. ‘गुलाब जामुन’ च्या निमित्तानं ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी बऱ्याच वर्षांनंतर चित्रपटात काम करणार होती. त्यामुळे या दोघांचे चाहतेही या जोडीला एकत्र पाहण्यास उत्सुक होते. मणिरत्नम् यांच्या ‘रावण’ या चित्रपटातून या दोघांनी शेवटचं एकत्र काम केलं होतं.
मात्र ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार ऐश्वर्या आणि अभिषेकनं ‘गुलाब जामुन’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या वृत्ताची अधिकृत घोषण अद्यापही झालेली नाही, मात्र या दोघांनी एकत्र काम करावं अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.