माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन आणि कुठून लंडनहून येऊन इथे ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून लौकिक मिळवणारी कतरिना कैफ यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हावे, असे खरेतर काहीच नव्हते. मात्र, या दोघींचा समान धागा एकाच ठिकाणी अडकत होता तो म्हणजे सलमान खान. ऐश्वर्याबरोबरच्या प्रेमभंगानंतर सलमान कतरिनाच्या प्रेमात पडला होता. तेव्हापासून या दोन अभिनेत्रींमध्ये म्हणे शीतयुध्द सुरू होते. इतके की कित्येकवेळा कतरिना समोर येऊनही ऐश्वर्याने तिला ओळख दाखवली नव्हती. मात्र, असे असूनही ऐश्वर्याने कानला जाण्यापूर्वी चक्क दोन तास दुबईत कतरिनाबरोबर घालवले.
कतरिनाचे नाव सलमानशी जोडले गेले असल्यानेच ऐश्वर्याने कधीही तिच्याशी मैत्री केली नाही, असे बोलले जाते. ‘धूम ३’च्या सेटवर अभिषेक बच्चनला भेटायला गेलेल्या ऐश्वर्यानेही त्याहीवेळेला कतरिनाची दखल घेतली नव्हती. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही सलमानशी जोडली गेलेली कुठलीच गोष्ट सहजी स्वीकारायला ऐश्वर्या तयार नाही हे सहज लक्षात येत होते. मात्र, कानला जाण्यापूर्वी ऐश्वर्या चक्क दुबईत थांबली आणि तिने कतरिनाबरोबर दुबईच्या एका हॉटेलमध्ये जेवणही घेतल्याचे कळते.
कतरिना त्यावेळी ‘बँग बँग’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी दुबईतच होती. पण, तरीही या दोघी दुबईत का एकत्र आल्या, त्यांनी दोन तास काय गप्पा मारल्या आणि त्यांना एकत्र आणण्याची किमया कोणाची?, या गोष्टी अजून कळलेल्या नाहीत.
ऐश्वर्या कानसाठी फ्रान्सला रवाना होणार होती. त्याचदिवशी फ्रान्समध्ये हवाई वाहतूक कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे तिला एक दिवस थांबावे लागले होते. त्यामुळेच बहुधा ऐश्वर्याने त्यादिवशी कतरिनाची भेट घेतली, असा तर्क काढला जातो आहे. पण, ऐश्वर्या दुबईत थांबली म्हणजेच तिने कतरिनाला भेटले पाहिजे असा काही नियम नव्हता. या दोघींबरोबर आणखी एक मैत्रीण होती. तिनेच बहुधा ही किमया साधली असावी. पण, सलमानला सोडून कतरिनाने रणबीरचा हात पकडला असल्यानेही कदाचित ऐश्वर्याचा तिच्याबद्दलचा राग निवळला असावा. असो, बॉलिवूडच्या या आजी-माजी ग्लॅमरस सुंदऱ्या त्यानिमित्ताने एकत्र आल्या हेही नसे थोडके!
आम्ही दोघी मैत्रिणी!
माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन आणि कुठून लंडनहून येऊन इथे ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून लौकिक मिळवणारी कतरिना कैफ यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हावे, असे खरेतर काहीच नव्हते.
First published on: 31-05-2014 at 02:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai and katrina kaif are best friends