अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री  रेखा यांच्या  प्रेमप्रकरणाचे किस्से आजही बॉलीवूड इंडस्ट्रीत चवीने चघळले जातात.  तरीही सार्वजनिक कार्यक्रम आणि व्यासपीठांवर बच्चन कुटुंबियातील व्यक्तींनी रेखा यांना मानाची वागणूक दिली आहे. मात्र, बच्चन कुटुंबियांची सून ऐर्श्वया राय ही त्याच्याही एक पाऊल पुढे गेली आहे. नुकत्याच झालेल्या स्टार डस्ट पुरस्कार सोहळ्यादरम्यान ऐश्वर्या रायने रेखा यांना ‘आई’ असे संबोधले आणि पुन्हा एकदा नव्या चर्चेला सुरूवात झाली.
या पुरस्कार सोहळ्यात ‘जझबा’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणाऱ्या ऐश्वर्याला पुरस्काराने गौरवण्यात आले. ऐश्वर्याला रेखा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्विकारण्यासाठी व्यासपीठावर गेल्यानंतर ऐश्वर्या राय खाली वाकून रेखा यांच्या पाया पडली. त्यानंतर रेखा यांनी ऐश्वर्याला आशिर्वाद देत पुरस्कार तिच्या हातात दिला. ऐश्वर्याला हा पुरस्कार देणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असून आणखी कैक वर्षे मी तिला असे पुरस्कार देत राहील, असे रेखा यांनी म्हटले. दरम्यान, पुरस्कार मिळाल्यानंतर आभारप्रदर्शनाच्या भाषणात ऐश्वर्या रायने सर्वांचे आभार मानताना रेखा यांच्या दिशेने वळून दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि म्हटले की, ‘माँ’कडून हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्यासाठी ही गोष्ट खूप विशेष असल्याचे यावेळी ऐश्वर्याने सांगितले. यावेळी अमिताभ बच्चनही प्रेक्षकांमध्ये बसले होते. मात्र, ऐश्वर्या हे सगळे बोलत असताना अमिताभ यांच्या चेहऱ्यावर अगदी शांत भाव होते.

Story img Loader