‘कान्स’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि आपली ऐश्वर्या राय-बच्चनचे नाते जुने आणि खासही आहे. त्यामुळे ऐश्वर्याला कान्सचे आमंत्रण नाही, असे आजपावेतो झालेले नाही. यावर्षी भारतीय चित्रपटसृष्टीचे शताब्दीवर्ष कान्समध्येही साजरे केले जाणार असून नेहमीप्रमाणे ऐश्वर्याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मात्र, यावर्षी तिच्याबरोबर सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनाही ‘कान्स’चे खास आमंत्रण आहे.
मे महिन्यात होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अमिताभ आणि रजनीकांत केवळ पाहुणे म्हणून उपस्थित राहणार नाहीत. ‘द ग्रेट गॅट्सबी’ या आपल्या कारकीर्दीतील पहिल्या हॉलिवूडपटाचा खास खेळ हे अमिताभ बच्चन यांच्यासाठी कान्सला हजेरी लावायचे प्रमुख आकर्षण आहे. तर रजनीकांत यांच्या महत्त्वाकांक्षी ‘कोचडियान’ या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यांदाच ‘कान्स’मध्ये दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे ‘कान्स’चा दौरा हा रजनीकांतसाठीही महत्त्वाचा आहे. खरेतर, ६२ वर्षीय रजनीकांतला त्यांच्या तब्येतीमुळे डॉक्टरांकडून एवढय़ा लांबच्या दौऱ्याला नकार मिळाला आहे. पण, ‘कोचडियान’मध्ये तन-मन-धनाने गुंतलेल्या रजनीकांतने डॉक्टरांच्या सल्ल्याला केराची टोपली दाखवत कान्सला उपस्थित राहणार असल्याचे कळवले आहे. ‘कोचडियान’ तांत्रिकदृष्टय़ा अतिशय उत्तम चित्रपट असल्याचे बोलले जाते. संगीतकार ए. आर. रेहमाननेही चित्रपटाचा ‘रफ कट’ पाहून आश्चर्य व्यक्त केले होते. ‘कोचडियान’ला परिचितांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे भारावलेल्या रजनीकांतला कान्समध्ये काय आणि कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता लागली आहे. त्या निमित्ताने भारतातील हे दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.
‘कान्स’मध्ये यावेळी भारतीय कलावंतांना विशेष निमंत्रण असून काही कलावंतांचा सन्मानही करण्यात येणार असल्याचे कान्सच्या प्रवक्त्यांनी जाहीर केले आहे. या सर्वात ऐश्वर्याचा मुख्य सहभाग राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऐश्वर्या फ्रेंच प्रसाधन कंपनीची ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर असल्यापासून कान्स चित्रपट महोत्सवाशी तिचे नाते जोडले गेले आहे. ऐश्वर्यासाठी आमच्या मनात खास जागा आहे. त्यामुळे तिची उपस्थिती आमच्यासाठी नेहमीच सन्माननीय असल्याचेही प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader