अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ही तिच्या उत्तम अशा अभिनयासाठी प्रसिद्ध आहेच. पण तिचे सामाजिक भानही अनेकदा दिसून आले आहे. नुकतीच याची प्रचिती मिळाली असून ऐश्वर्याने ख्रिसमसच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त मुलांची भेट घेतली. त्यामुळे एकीकडे सगळे आपले मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्यासोबत ख्रिसमस सेलिब्रेशन करत असताना ऐश्वर्या मात्र या लहानग्यांसोबत वेळ घालवत होती. टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयातील साधारणपणे २०० मुलांसोबत तिने हा खास दिवस साजरा केला. या लहानग्यांनी बसवलेल्या कार्यक्रमाला उत्तम दाद देत तिने स्वत:ही या मुलांसोबत डान्स केला. त्यावेळी या कॅन्सरग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
यावेळी ऐश्वर्याने कजरारे..कजरारे या गाण्यावर डान्स केला. गुलाबी रंगाच्या घेरदार ड्रेसमध्ये ऐश्वर्याचे सौंदर्य खुलून दिसत होते. तिच्या डान्सचा हा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिच्यासोबत डान्स करणाऱ्या मुलांना नंतर तिने अतिशय प्रेमाने जवळही घेतले. तसेच त्यांच्यासोबत भरपूर फोटोही काढले. यावेळी रुग्णालयातील चिमुकल्यांनी तिला ग्रिटींग कार्ड आणि गुलाब देऊन तिचे स्वागत केले. तर ऐश्वर्यासोबत त्यांनी केकही कापला, मुलांनीही यावेळी सांताक्लॉजच्या टोप्या घातल्या होत्या. लवकरच ऐश्वर्याचा गुलाब जामुन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ऐश्वर्यासोबत तिचा नवरा अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.