गेले दोन वर्ष ऐश्वर्या राय-बच्चनची ‘कान’वारी हा चर्चेचा विषय राहिलेला आहे. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या पुन्हा चित्रपटांकडे वळेल, असा जाणाकारांचा होरा होता. पण, त्यानंतरही गेली दीड-दोन वर्ष ऐश्वर्याने आपल्या पुनरागमनासाठी वजन कमी करण्याची घाई वगैरे दाखवली नाही. मात्र, त्यामुळेच ज्या ग्लॅमरस ऐश्वर्याचा ‘कान’च्या रेड कार्पेटवर बोलबाला झाला त्याच रेड कार्पेटवरून तिला टीका-टोमण्यांनाही तोंड द्यावे लागले आहे. किंबहुना, ज्या ‘लॉरिएल’ ब्रँडचे ती प्रतिनिधीत्व करते आहे तिथूनही तिला डच्चू देण्याचा प्रयत्न केला जातो आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. गेली काही वर्ष सातत्याने ऐश्वर्या ‘कान’ महोत्सवात ‘लॉरिएल’चे प्रतिनिधीत्व करत आली आहे. मात्र, बाळंतपणानंतर ऐश्वर्याऐवजी ‘लॉरिएल’ने सोनम कपूरला पसंती दिली. गेल्यावर्षी सोनमने ‘लॉरिएल’साठी ‘कान’च्या रेड कार्पेटवर प्रतिनिधीत्व केले. ऐश्वर्याही तिथे उपस्थित झाली होती पण, तिने त्यावेळी लॉरिएलचे प्रतिनिधीत्व केले नाही. यावर्षीही सोनमच पुन्हा एकदा ‘लॉरिएल’चे प्रतिनिधीत्व करत असली तरी ऐश्वर्याही यावेळी तीन दिवस आमची प्रतिनिधी म्हणून हजर राहणार असल्याचे लॉरिएलने जाहीर केले होते. प्रत्यक्षात, ऐश्वर्या यावेळी एकच दिवस ‘कान’ला हजेरी लावू शकणार आहे.
फ्रान्सच्या हवाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे ठरलेल्या तारखांना ऐश्वर्या कानला जाऊ शकलेली नाही. मात्र, २० आणि २१ मेला ती तिथे उपस्थित राहणार असून तिला या महोत्सवात आमचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पुरेपूर वाव मिळेल, याची काळजी घेतली जाईल, असे ‘लॉरिएल’च्या सूत्रांनी अधिकृतरित्या म्हटले आहे. मात्र, कधी ऐश्वर्या जाहिरातीत असूनही तिला बॅनरवर स्थान न मिळणं, सोनमला सातत्याने प्रतिनिधी म्हणून पुढे करणं या लपंडावामुळे तिची आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली प्रतिमा अधिकच वादात अडकत चालली आहे. वैयक्तिक स्तरावरही ऐश्वर्याच्या आयुष्यात सुरू असणाऱ्या कुरबुरी, तिच्या वजनावरून सुरू असलेली टीका या सगळ्यातून बाहेर पडून ऐश्वर्या एक अभिनेत्री म्हणून पुन्हा दमदार सुरूवात करणार का?, याबद्दल तिच्या चाहत्यांनाही उत्सूकता आहे.
ऐश्वर्याची कानवारी पुन्हा वादात
गेले दोन वर्ष ऐश्वर्या राय-बच्चनची ‘कान’वारी हा चर्चेचा विषय राहिलेला आहे. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या पुन्हा चित्रपटांकडे वळेल, असा जाणाकारांचा होरा होता.
First published on: 18-05-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan to walk the red carpet on may 20