बॉलिवूड चित्रपटांवर प्रेक्षकांनी बहिष्कार घातल्यामुळे अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट अपयशी झाले. बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड चर्चेत असतानाच गेले काही दिवस बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट असा वाद सुरु झाला आहे. या वादात प्रेक्षकांबरोबराच अनेक बॉलिवूड कलाकारांनीही उडी घेतली आहे. आता अभिनेत्री ऐश्वर्या राय – बच्चन हिने या वादाबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : आमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन
ऐश्वर्याने आतापर्यंत अनेक तामिळ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर सध्या ती ‘पोन्नियिन सेल्वन १’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ऐश्वर्याने दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूड चित्रपट यावरून सुरु असलेल्या वादावर भाष्य करत तिचे विचार मांडले.
ऐश्वर्या म्हणाली, “आपल्याला पारंपरिक विचारांतून बाहेर पडण्याची गरज आहे. आताची वेळ चांगली आहे कारण दोन्ही इंडस्ट्रीमधील दुरावा कमी होत आहे. आपल्याला खूप प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आपले चित्रपट जागतिक पातळीवर पोहोचायला मदत होतेय. म्हणून मला असं वाटतं की, आपण पारंपरिक विचार करण्याऐवजी वेगळा विचार करायला हवा. कलेबद्दल, कलेच्या प्रत्येक पैलूबद्दल प्रेक्षकांना माहिती व्हायला हवी. काही वर्षांपूर्वी माहिती गोळा करण्याची साधनं मर्यादीत होती; परंतु आता तसं राहिलं नाही. आता देशभरातील तसंच जगभरातील प्रेक्षकांना वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट बघणं, त्यांचा आनंद घेणं सोपं झालं आहे.”
हेही वाचा : “….तेव्हा अमेरिकेचा शोधही लागला नव्हता,” आपल्या भाषणाने चियान विक्रमने वेधले लक्ष
‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन ही पझुवूरची राणी नंदिनी आणि तिची आई मंदाकिनी देवी अशी दुहेरी भूमिका साकारणार आहे. तिच्याबरोबर या चित्रपटात चियान विक्रम, कार्थी, रवी, शोभिता धूलिपाला, तृषा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चोल साम्राज्याच्या महागाथेवर आधारीत ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाचा पहिला भाग येत्या ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.