#MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाच्या प्रकरणांविषयी व्यक्त होत आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी भाष्य केलं असून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने देखील तिचं मत व्यक्त केलं आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमधील विकास बहल, चेतन भगत, रजत कपूर, कैलाश खेर,आलोक नाथ यांसारख्या दिग्गजांवरदेखील #MeToo अंतर्गत गैरवर्तन आणि असभ्य वर्तणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक जण आपलं मत व्यक्त करत आहेत.
‘सध्या सुरु असलेल्या #MeToo या मोहिमेमुळे अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाच्या फोडत आहेत. त्यामुळे मला खरंच त्यांचं कौतुक वाटतं. ज्या महिलांवर असा अन्याय झाला आहे अशा महिलांच्या पाठिशी मी कायम खंबीरपणे उभी असेन’, असं ऐश्वर्याने म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या हे बोलत होती.
पुढे ती असंही म्हणाली, ‘महिलांवरील अन्याय हा गेल्या अनेक काळापासून होत आहे. तरीदेखील कोणतीही स्त्री याविषयी स्पष्टपणे व्यक्त होत नव्हती. मात्र #MeToo या मोहिमेअंतर्गत महिला बोलू लागल्या आहेत. त्यांच्यावरील अन्याय आज समोर येत आहे. मला या महिलांच खरंच कौतुक वाटतं. त्यामुळे माझा त्यांना पाठिंबा असेल. मी यापूर्वीही महिलांवर होणाऱ्या अन्यायाविषयी माझं मत ठामपणे मांडत आले आहे आणि यापुढे मांडत राहिन’.