दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांनी सोमवारी त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली. या दोघांनी लग्नाच्या १८ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर करत त्यांनी घटस्फोटाची माहिती दिली. त्यानंतर आता या दोघांचे जुने व्हिडीओ तसेच सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आल्या आहेत. ऐश्वर्यानं जवळपास ३ महिन्यांपूर्वीच धनुषसाठी खास पोस्ट लिहिली होती. तिची हीच पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेत आहे. विशेषतः या पोस्टला तिने दिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या वृत्तानं त्यांच्या चाहत्यांना यासाठी जास्त धक्का बसला आहे कारण ऐश्वर्यानं धनुषसाठी काही महिन्यांपूर्वीच एक खास पोस्ट लिहिली होती. ऑक्टोबर महिन्यात धनुष आणि ऐश्वर्याचे वडील रजनीकांत यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. रजनिकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर धनुषला उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

धनुष आणि रजनीकांत यांना पुरस्कार मिळाल्यानंतरचा एक फोटो ऐश्वर्यानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘हे दोघंही माझे आहे आणि हा आज इतिहास रचला गेला आहे. एक मुलगी आणि पत्नी म्हणून मला अभिमान वाटत आहे.’ ऐश्वर्यानं काही महिन्यांपूर्वीच धनुष पत्नी म्हणून आनंद व्यक्त केला असतानाच आता अशाप्रकारे त्याचं वेगळं होणं चाहत्यांना भावुक करत आहे.

दरम्यान या दोघांचीही लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. २००२ मध्ये kadhal konden च्या स्क्रीनिंगच्या वेळी ऐश्वर्या आणि धनुष यांची पहिली भेट झाली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासोबत आली होती. त्यावेळी धनुषचा परफॉर्मन्स पाहून ती त्याच क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती. विशेष म्हणजे स्क्रिनिंगच्या दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषच्या घरी पुष्पगुच्छ पाठवत त्याला संपर्कात रहा असं सांगितलं होतं.

ऐश्वर्याने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. त्यानंतर २००४ रोजी धनुष आणि ऐश्वर्याने घरातल्यांच्या संमतीने लग्न केलं. या दोघांचा लग्न सोहळा दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी एक होता.