अवघ्या महाराष्ट्राला आपल्या संगीतानी वेड लावणारी जोडी म्हणून अजय-अतुलला ओळखले जाते. ते दोघेही कायमच चर्चेत असतात. सध्या ते दोघेही अभिनेता रितेश देशमुखच्या वेड चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील गाण्याला अजय-अतुल या जोडीने संगीतबद्ध केले आहे. सध्या या चित्रपटातील बहुतांश गाणी ही हिट होताना दिसत आहे. मात्र नुकतंच अजय-अतुलने कृपया आमच्या गाण्यांचं रिमिक्स करु नका, अशी विनंती केली आहे.
बॉलिवूडचे मराठमोळं जोडपं रितेश देशमुख-जिनिलीया या दोघांचा पहिलावहिला मराठी चित्रपट ‘वेड’ हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अजय अतुलही उपस्थित होते. यावेळी त्यांना चित्रपटाच्या रिमिक्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गायक आणि संगीतकार अजय गोगावले फार स्पष्ट भाषेत उत्तर दिले. त्यावेळी त्याने जाहीर नाराजीही व्यक्त केली.
आणखी वाचा : “मी माझ्या डोळ्यांसमोर…” वडिलांच्या निधनाबद्दल सांगताना अपूर्वा नेमळेकरला अश्रू अनावर
“जेव्हा माऊलीचं डिजे व्हर्जन झालं होतं तेव्हा मला फार वाईट वाटलं होतं. मी ते पूर्ण गाणं लिहिलं आहे आणि मला ते डिजे व्हर्जन अजिबात आवडलं नव्हतं. ज्या गाण्यांची रिमिक्स होतात त्याची करा. कारण रिमिक्स हा एक वेगळा भाग आहे. लोकांना डान्स फ्लोरवर वेगळी गाणी ऐकायला आवडतात, जे खरं तर ठिक आहे.
सध्या दोन मार्ग आहेत, एक जण या रस्त्याने जातो आणि दुसरा त्या रस्त्याने. आम्ही त्यावर ओरिजनलचा मार्ग निवडला आहे. आम्ही ओरिजनलच करावं असं वाटतं. पूर्वी ३० वर्षापूर्वीची किंवा १५ वर्षांपूर्वीची गाणी रिमिक्स व्हायची. पण आता ३ ते ४ वर्षांपूर्वीची बिचारी गाणीही रिमिक्स होत आहेत. लगेच त्याचे रिमिक्स होतात. आम्ही तो ओरिजनल मार्ग निवडलाय, त्यामुळे कृपया आमच्या गाण्यांचं रिमिक्स करु नका”, असे अजय गोगावले म्हणाले.
आणखी वाचा : “कधी अशी वेळ येते आणि…” ‘हर हर महादेव’बद्दलच्या ‘त्या’ निर्णयानंतर सुबोध भावेची पोस्ट चर्चेत
दरम्यान येत्या ३० डिसेंबरला त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अशोक सराफ रितेशने साकारलेल्या पात्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच ट्रेलरमध्ये चित्रपटातील इतर कलाकार विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर आदी कलाकार दिसत आहेत.