बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण अभिनीत ‘मैदान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ७ मार्च रोजी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेलर लॉंचचा कार्यक्रम मुंबईत आयोजित केला होता. या कार्यक्रमात दिग्दर्शक अमित शर्मा, अजय देवगण, प्रियामणी आणि गजराज राव आदी उपस्थित होते. बिग बजेट आणि मोठी स्टारकास्ट असलेले ‘मैदान’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. मनोरंजनसृष्टीत चित्रपटाच्या तारखा क्लॅश होण्याची ही काही पहिली वेळ नाही.
जुहूमध्ये पार पडलेल्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमात जेव्हा अजय देवगणला या क्लॅशबद्दल विचारण्यात आलं तेव्हा याबद्दल पहिल्यांदाच त्याने मौन सोडले. अजय म्हणाला, “मी याच प्रश्नाची वाट पाहत होतो. मी याला क्लॅश नाही म्हणणार. कारण- बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या दृष्टीने दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित व्हावेत, असं मला कधीच वाटत नाही. परंतु काही परिस्थिती अशा असतात; ज्यात तुम्हाला तुमचा चित्रपट दुसऱ्या चित्रपटासह प्रदर्शित करण्याशिवाय पर्याय नसतो.”
हेही वाचा… ‘या’ कारणामुळे करण जोहर अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात होता गैरहजर; जामनगरला निघण्याआधीच…
अजय पुढे म्हणाला, “दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. अक्षय, मी आणि आम्ही सर्व जण एका कुटुंबासारखे आहोत आणि आम्ही चांगले मित्र आहोत. आमचा दृष्टिकोन वेगळा आहे. आम्ही त्याकडे एक क्लॅश म्हणून पाहत नाही. आमच्यासाठी हा एक मोठा वीकेंड आहे; ज्याचा आमच्या चित्रपटांना नक्कीच फायदा होईल. दोन्ही चित्रपट चांगला व्यवसाय करतील, असा मला विश्वास आहे.”
दरम्यान, ‘मैदान’ चित्रपटात अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहे. प्रियामणी, गजराज राव व बंगाली अभिनेता रुद्रनील घोष यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ‘मैदान’ एप्रिलमध्ये ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. माहितीनुसार, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जरी १२ एप्रिल सांगितली जात असली तरी नेमकी तारीख अद्याप निर्मात्यांनी जाहीर केलेली नाही.