पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीय व्यक्तीने संताप व्यक्त केला असून या हल्ल्याचं चोख देण्याची मागणी करण्यात येत आहे. बॉलिवूडमध्येही या घटनेचे पडसाद उमटले असून इंडियन फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने (आयएफटीडीए) पाकिस्तानी कालाकारांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. आयएफटीडीएच्या या निर्णयाला अजयने पाठिंबा दिला असून हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे.
अजयचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यासोबतच चित्रपटाच्या टीमने शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना अजयने पाकिस्तानी कलाकारांवर घातलेली बंदी योग्य असल्याचं म्हटलं आहे, त्यासोबतच आम्ही लष्कर आणि सरकारच्या सोबत आहोत, असंही म्हटलं.
“पुलवामा हल्ल्यात आपल्या जवानांनी त्यांचे प्राण गमावले आहेत. त्यांच बलिदान असं व्यर्थ जाणार नाही. आपलं सरकार आणि भारतीय लष्कर या हल्ल्याचं नक्कीच चोख प्रत्यत्तर देतील. मला सरकार किंवा लष्कराला कोणतेही सल्ले द्यायचे नाहीत. त्यांना त्यांचं काम माहित आहे. ते आपल्या शहीद जवानांना नक्कीच न्याय मिळवून देतील आणि त्यांच्या या कार्यात माझा कायम त्यांना पाठिंबा असेल”, असं अजय म्हणाला.
पुढे तो असंही म्हणाला, “आयएफटीडीए घेतलेला निर्णय योग्य आहे. पाकिस्तानी कलाकारांवर घातलेली बंदी योग्य असून माझा याला पाठिंबा आहे”.
दरम्यान, अजयचा ‘टोटल धमाल’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट झळकल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये मुंगडा गाण्याचं रिक्रिएट केल्याप्रकरणी लता मंगेशकर यांची माफी मागण्यासही तयार असल्याचं त्याने म्हटलं आहे.