बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अजय देवगण आणि काजोल. पडद्यावर दिसणाऱ्या काजोल अजयच्या केमिस्ट्रीपेक्षाही खऱ्या आयुष्यात दोघांचे नात अधिक मजबूत आहे. वडिलांच्या विरोधात जाऊन काजोलने अजय देवगणसोबत लग्न केले. पण आज त्यांची जोडी बॉलिवूडमधील हिट कपलपैकी एक म्हणून ओळखली जाते. ते दोघेही त्यांचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतंच अभिनेता अजय देवगणने पत्नी काजोलचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.
जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने अजय देवगणने त्याच्या ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने काजलचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत काजोल आणि अजय दोघेही एका ठिकाणी कॉफी पिताना दिसत आहे. यावेळी काजोल ही कोणत्या तरी विषयावर बडबड करताना दिसत आहे. तर अजय हा फार शांतपणे तिचे ऐकताना दिसत आहे. यावेळी अजयच्या चेहऱ्यावरचे हावभाव फार बोलके असल्याचे दिसत आहेत.
या व्हिडीओद्वारे अजयने काजोलची खिल्लीही उडवली आहे. या व्हिडीओला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे. “आज आणि दररोज जागतिक श्रवण दिन साजरा करत आहे”, असे त्याने या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. त्यांच्या अनेक चाहत्यांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर करत कमेंट केली आहे.
दरम्यान १९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या दरम्यान अजय आणि काजोलची पहिली भेट झाली होती. अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता. मात्र काजोलने घरी सांगताच तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलणे बंद केले होते. काजोलने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे तिच्या वडिलांना वाटत होते. पण नंतर काही दिवसांनी काजोलच्या घरातील देखील लग्नासाठी तयार झाले. त्यांनी १९९९मध्ये लग्न केले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. अजय आणि काजोलच्या लग्नाला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती.