२०२२ साली प्रदर्शित झालेला एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला. चित्रपटातील राम चरण व ज्युनिअर एनटीआर यांच्या केमिस्ट्री आणि अभिनयाचीही चांगलीच चर्चा झाली. फक्त भारतातच नव्हे तर जपानमध्येसुद्धा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली. परदेशातील वेगवेगळ्या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यामध्येही या चित्रपटाची दखल घेतली गेली.
‘बाहुबली’सारखा बिग बजेट चित्रपट देणाऱ्या राजामौली यांनी ‘आरआरआर’साठीही प्रचंड पैसा खर्च केला. राम चरण, ज्युनिअर एनटीआर यांच्या बरोबरीनेच या चित्रपटात अजय देवगण व आलिया भट्टसारखे बॉलिवूड स्टार्सही झळकले. चित्रपटात या दोघांच्याही भूमिका छोट्या असल्या तरी त्या महत्त्वपूर्ण होत्या. अजय देवगणने यामध्ये राम चरणने साकारलेल्या म राजू यांच्या भावाची भूमिका निभावली होती.
आणखी वाचा : इमरान हाश्मीने पहिल्या चित्रपटासाठी बदललेलं स्वतःचं नाव, पण…; अभिनेत्याने सांगितला मजेशीर किस्सा
आठ मिनिटांच्या या भूमिकेसाठी अजय देवगणने घेतलेल्या मानधनाबद्दल माहिती नुकतीच समोर आली आहे. ‘गेट्स सिनेमा’ या सोशल मीडिया पेजच्या ट्विटर अकाऊंटने नुकतंच याबद्दल ट्वीट करत अजय देवगणने ‘आरआरआर’मधील कॅमिओसाठी ३५ कोटींचे मानधन घेतल्याचे स्पष्ट केले आहे. आठ मिनिटांच्या भूमिकेसाठी ३५ कोटींचे मानधन याप्रमाणे एका मिनिटासाठी अजयने तब्बल ४.३५ कोटी रुपये मानधन आकारले असल्याचं आपल्याला स्पष्ट होत आहे.
अद्याप अजय देवगणने या मानधनाच्या बातमीची अन् त्याला मिळालेल्या रकमेची पुष्टी केलेली नाही. पण जर या बातमीमध्ये तथ्य असेल तर एवढ्या छोट्याश्या भूमिकेसाठी एवढं मानधन घेणारा अजय देवगण हा पहिला अभिनेता ठरेल. अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘शैतान’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वशीकरण, काळी जादू यावर बेतलेल्या या चित्रपटात अजय देवगणसह दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका आणि आर माधवन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ८ मार्च २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.