बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांवर वेगळीच छाप सोडली होती. सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटातील अजय देवगणचा अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच अजयने शेअर केलेल्या एका पोस्टनंतर या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
अजय देवगणनने त्याच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करताना काही तिकिट्स, बिल आणि सत्संगाची सीडी याचे फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना अजय देवगणने कॅप्शनमध्ये लिहिलं, “काही जुनी बिल्स आणि तिकिटं आज सापडली.” त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कारण ‘दृश्यम’ चित्रपटाची कथा २ ऑक्टोबरच्या भोवती फिरते. त्यामुळे त्याआधी अजय देवगणने केलेलं हे ट्वीट चर्चेत राहिलं होतं. या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या धम्माल प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या.
आणखी वाचा- “मधुबाला- दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी मसाला लावून…” अभिनेत्रीच्या बायोपिकला बहिणीचा विरोध
आता चित्रपटाच्या मेकर्सनी प्रेक्षक आणि चाहत्यांचा उत्साह पाहून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे. अजयने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘दृश्यम २’चं पोस्टर शेअर करताना लिहिलं, “२ आणि ३ ऑक्टोबरला काय झालं होतं माहीत आहे ना? विजय साळगांवकर त्याच्या कुटुंबासह परत येतोय.” अजयने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये त्याच्यासह त्याची पत्नी आणि मुली दिसत आहे. त्यांच्या समोर महा सत्संग मंदिर आणि पोस्टरच्या एका कोपऱ्यात केस रिओपन असं म्हटलं आहे.
आणखी वाचा- मराठी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा ‘दृश्यम २’मध्ये दिसणार, अजय देवगणबरोबर करणार काम
अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. या चित्रपटात अजयसह श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका होत्या. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ६७.१७ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. आता याचा दुसरा भाग येत्या १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर चित्रपटाचा टीझर उद्या म्हणजेच २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.