अभिनेता अजय देवगण सध्या पॅरिसमध्ये कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. कालच (२ एप्रिल) अजयने ४९वा वाढदिवस साजरा केला. इन्स्टाग्रामवर त्याने या व्हेकेशनचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. मात्र, या फोटोवर वाढदिवसाच्या शुभेच्छांऐवजी नेटकऱ्यांची टीकाटिप्पणीच सर्वाधिक पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी अजयला धारेवर धरण्याचं कारण म्हणजे, या फोटोमध्ये तो त्याच्या ७ वर्षीय मुलासोबत उभा असून सिगारेट ओढताना पाहायला मिळत आहे.
आपल्या मुलाला तो जवळ घेऊन उभा असल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, त्याच वेळी त्याच्या उजव्या हातात सिगारेटसुद्धा आहे. यावरूनच सार्वजनिक ठिकाणी लहान मुलासमोर धुम्रपान करणं कितपत योग्य आहे, असा सवाल नेटीझन्स करत आहेत.
वाचा : IPLदरम्यान क्रिकेटला सुनील ग्रोवर देणार कॉमेडीचा तडका
तू अनेकांसाठी आदर्श आहेस. अशावेळी लहान मुलांसमोर धुम्रपान करून तू कोणता आदर्श लोकांसमोर ठेवत आहेस, असा प्रश्न एका युजरने केला आहे. तर अशा वागणुकीमुळे सेलिब्रिटी इतरांसमोर चुकीचं उदाहरण ठेवत आहेत, असं एकाने म्हटलं. विशेष म्हणजे, मुलांचं आरोग्य आणि स्वच्छतेबाबत वक्तव्य करणाऱ्या काजोलनेसुद्धा हाच फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नेटकऱ्यांच्या या टीकांवर आता अजय काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.