अजय देवगण याचा ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला . पुढील महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘मी टु’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तणुक आणि बलात्काराचा आरोप असलेल्या आलोक नाथ यांचाही समावेश आहे. आलोक नाथ यांच्या चित्रपटातील सहभागामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी ‘मी टु’ अंतर्गत आरोप असलेले कलाकार, दिग्दर्शकांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला अशात ‘दे दे प्यार दे’ चित्रपटात आलोक यांना पाहून माध्यमांनी अजयला प्रश्न विचारले. मात्र आलोक नाथ यांच्याविषयी बोलण्याची ही वेळ नाही. चित्रपटाचं चित्रीकरण हे फार पूर्वीच पार पडलं होतं असं अजयनं म्हटलं आहे. या चित्रपटात आलोक हे अजय देवगणच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत.

ऑक्टोबर महिन्यात ‘तारा’ मालिकेची लेखिका आणि दिग्दर्शिका विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. या आरोपानंतर अनेक अभिनेत्री पुढे आल्या होत्या. फेसबुक, ट्विटर पोस्टद्वारे काही अभिनेत्रींनी आलोक नाथ यांच्यावर लैंगिक आणि असभ्य गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप केले होते. अशावेळी अजयच्या चित्रपटात आलोक नाथ यांना पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यापूर्वी नाना पाटेकर यांच्यावरही असभ्य वर्तणुकीचे आरोप होते. या आरोपांनंतर नाना पाटेकर यांची ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटातून गच्छंती करण्यात आली होती. नाना पाटेकर यांच्यासोबतच साजिद खान यांच्यासोबत काम न करण्याची भूमिका अक्षय कुमार, रितेश देशमुखसारख्या कलाकारांनी घेतली होती. मात्र हिच भूमिका अजयनं न घेतल्यानं  चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgn said about metoo accused alok naths casting in de de pyaar de