सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा वाढत आहे. एकीकडे अनेक दाक्षिणात्य चित्रपट सध्या भारतात सुपरहिट ठरत आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रीय भाषेवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हा संपूर्ण वाद सुरु झाला आहे. यावेळी त्याने हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही, असे वक्तव्य केले होते. त्याच्या या विधानामुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला होता. त्यावर आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने ट्विट करत त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
अजय देवगण याने काही तासांपूर्वी एक ट्विट केले आहे. “किच्चा सुदीप…, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच असेल. जन गण मन”, असे ट्विट अजय देवगण याने केले आहे.
“हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही तर…”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
अजय देवगणच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक नेटकरी अजयच्या या ट्विटवर चांगल्या वाईट प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अजय सर, जर सुदीपला वाटत असेल की आपल्या मातृभाषेतील चित्रपटांसमोर हिंदी आणि हिंदी चित्रपट अस्तित्वात नाहीत, तर त्यांनी आपल्या मातृभाषेचा आदर केला पाहिजे. त्यांनी त्यांचे चित्रपट केवळ त्याच्याच भाषेत प्रदर्शित केला पाहिजे. हिंदीत प्रदर्शित करण्याची सक्ती का? असा सवाल एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे.
“बॉलिवूडमधील कपूर कुटुंबाप्रमाणेच…”, दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवींनी व्यक्त केली ‘ती’ इच्छा
नेमकं प्रकरण काय?
दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने ‘R’-The Deadliest Gangster Ever या चित्रपटाच्या लाँचिंगला हजेरी लावली होती. यावेळी त्याने दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? या सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर दिले होते. तो म्हणाला की, “दाक्षिणात्य दिग्दर्शक सध्या अशा चित्रपटांची निर्मिती करत आहे ज्याचे जागतिक स्तरावर अस्तित्व असेल. बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक निर्माते हे तेलुगू आणि तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्याचे प्रमाण फार कमी आहे.”
“सध्या दक्षिणेत अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे, असे तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात. पण मला त्यात एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हवे तितके यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत”, असे दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने म्हटले आहे.