‘जंपिंग जॅक’ म्हणून ओळखल्या गेलेल्या जितेंद्र आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या मैत्रीपासून ते आत्ताच्या रोहित शेट्टी-अजय देवगण अशा अनेक मित्रांच्या जोडय़ा लोकप्रिय आहेत. पण फारशा माहिती नसलेल्या दोस्तांच्या दोन जोडय़ा आगामी चित्रपटांमध्ये रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत.
सध्या बॉलीवूडच्या नावाजलेल्या लहानपणीच्या मित्र-मैत्रिणींच्या जोडय़ांमध्ये अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिषेक बच्चन आणि अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेर, फरहान अख्तर-करण जोहर-हृतिक रोशन हे ‘फिल्मी’ कुटुंबांमुळे एकत्र आलेले त्रिकूट चांगलेच परिचित आहे. पण, आगामी ‘दृश्यम्’ चित्रपटात एकत्र काम करणाऱ्या अजय देवगण आणि तब्बू यांच्यातही लहानपणापासूनच मैत्री आहे. अजय आणि तब्बू यांनी याआधी ‘हकीकत’, ‘विजयपथ’सारख्या चित्रपटांमधून एकत्र काम केले आहे. मात्र, त्यांच्या दोस्तीची दास्तान अजूनपर्यंत फारशी माहिती नव्हती. तब्बू चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासून त्यांच्यात घट्ट मैत्री होती. तब्बू माझी चांगली मैत्रीण असल्याने तिच्याबरोबर काम करण्यात एक मजा असते. तुमचे मित्र-मैत्रीण जेव्हा तुमचे सहकलाकार असतात तेव्हा त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळाच अनुभव मिळतो, असे अजय देवगणने म्हटले आहे. ‘दृश्यम्’मध्ये तब्बू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. आणखी एक नवी मित्र-मैत्रिणीची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे. ‘एबीसीडी २’ या चित्रपटासाठी श्रद्धा कपूर आणि वरुण धवन पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. लहानपणापासूनच चांगली मैत्री असली तरी एकत्र सिनेमा करण्यासाठी दोघांनाही वाट पाहावी लागली. श्रद्धा आणि वरुण दोघांची फिल्मी कारकीर्दही थोडय़ाफार फरकाने एकत्रच सुरू झाली. ‘एबीसीडी २’ हा रेमो डिसूझा दिग्दर्शित सिक्वलपट पूर्णत: नृत्यावर आधारित आहे. वरुण नृत्यात तरबेज असला तरी श्रद्धासाठी त्याच्याबरोबर ताल धरणे हे आव्हान होते. पण वरुणशी असलेल्या बाँडिंगमुळे ते फारसे अवघड गेले नाही, असे श्रद्धाचे म्हणणे आहे. तर आत्तापर्यंत अलिया भट्ट, इलियाना डिक्रुझ, नर्गिस फाखरी, हुमा कुरेशी अशा अभिनेत्रींबरोबर काम केल्यानंतरही श्रद्धाबरोबरची के मिस्ट्री वेगळी असल्याचे वरुणचे म्हणणे आहे. आत्तापर्यंत मी अशी केमिस्ट्री कोणत्याही अभिनेत्रीबरोबर अनुभवलेली नाही. आमच्या दोघांच्या नात्यातील मैत्रीमुळे आलेली जी सहजता आहे, मोकळेपणा आहे, त्यामुळेच आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुलली आहे, असे वरुणचे म्हणणे आहे.

Story img Loader