‘जेता’च्या यशस्वी दिग्दर्शनानंतर अजिंक्य देवची दिग्दर्शन क्षेत्रातील पुढची झेप कोणती याकडे तुमचे नक्कीच लक्ष असेल. त्यानुसार त्याची चांगल्या कथानकावर पटकथा रचण्याची जुळवाजुळव सुरू आहे. पण दरम्यान त्याने तीन मराठी चित्रपटातून भूमिका पटकावल्या आहेत आणि त्यात तो विशेष खुशदेखिल आहे.
त्याचे हे तीन मराठी चित्रपट असे आहेत, योगेश जाधव दिग्दर्शित ‘नटी’ (हा चित्रपट जिया खानच्या आयुष्यावर निर्माण होत आहे), तर अनिल काकडे दिग्दर्शित ‘थोडं तुझं नि थोडं माझं’ या विनोदी चित्रपटात त्याने वर्षा उसगावकरसोबत भूमिका साकारली असून याचे बरेचसे चित्रीकरण गोवा येथे झाले आहे. तर ‘भेजा फ्राय’ या खुसखुशीत चित्रपटाचा निर्माता सागर बल्लारी आता मराठी चित्रपटाची निर्मिती करीत असून, रोहित जोशी दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्यला चांगली भूमिका मिळाली आहे.
याबाबत अजिंक्य देव सांगत होता, अडिच दशकाच्या रुपेरी वाटचालीनंतरही मला मनाजोग्या भूमिका मिळत आहेत आणि चांगली मागणी देखिल आहे म्हणून मी विशेष खूश आहे. दरम्यान, अभिनय देव दिग्दर्शित ‘चोवीस’ या मालिकेद्वारे रसिकांसमोर येत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून ‘कलर्स’ वाहिनीवर आठवड्यातून दोनदा याप्रमाणे एक तासाची ही मालिका असून, दहशतवादाविरोधातील या मालिकेची निर्मिती ‘अनिल कपूर फिल्म्स’ आणि आमच्या ‘रमेश देव प्रॉडक्शन’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. असेही अजिंक्य देवने सांगितले.

Story img Loader