मराठी चित्रपटांमध्ये नवनवीन विषय आणि वेगळ्या पद्धतीची मांडणी आणण्याचा प्रयत्न केला जातोय. सुजय डहाके दिग्दर्शित ‘आजोबा’ हा याच पंक्तीतील बहुचर्चित चित्रपट आहे. ‘आजोबा’ चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे या सिनेमातून प्रथमच एक ‘बिबट्या’ चित्रपटाचा हिरो म्हणून झळकणार आहे. मुंबईतील आरे कॉलनीत बिबट्यांच्या हल्ल्याच्या बातम्या वारंवार ऐकू येतात. बिबटे मानवी वस्तीत अतिक्रमण करतात कि आपण त्यांचा नैसर्गिक रहिवास हिरावून घेतला आहे, हा गंभीर प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला जातो. जितका जगण्याचा हक्क आपल्याला आहे, तितकाच त्यांनाही आहे. याच प्रश्नांवर भाष्य करणारा ‘आजोबा’ येत्या ९ मे ला राज्यात सर्वत्र झळकतोय. मराठीत प्रथमच या विषयावर सिनेमाची निर्मिती झाली असून याची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.
‘आजोबा’ चित्रपटाची कथा गौरी बापट यांनी लिहिली असून वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाला साकेत कानेटकर यांनी संगीत दिले आहे. उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, हिंदी अभिनेता यशपाल शर्मा, ऋषिकेश जोशी, श्रीकांत यादव, ओम भुटकर, नेहा महाजन, गणेश मयेकर, शशांक शेंडे, अनिता दाते, चिन्मय कुलकर्णी, विराट मडके, अनुया काळसेकर यांच्या भूमिका असलेला बहुचर्चित ‘आजोबा’ चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देईल. येत्या ९ मे ला राज्यभरातील विविध चित्रपटगृहातून ‘आजोबा’च्या जंगल सफारीचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajoba releasing on 9th may